ट्रेंडिंगताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजविशेष लेखव्हिडिओ
क्राईम

चाकण येथे ६ तासांच्या थरारक पाठलागानंतर ₹१.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त!

20 Sep 2026, 03:16 AM • TheLakhantalk
Spread the love

मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने आलेला ट्रक चाकण-तळेगाव चौकात जेरबंद; आरोपींवर ‘मोक्का’ लावण्यासाठी FDA ची शिफारस!

पुणे/पिंपरी-चिंचवड: अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चाकण परिसरात धाडसी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची तस्करी करणारा ट्रक पकडला आहे. राजगुरुनगर टोलनाक्यावर अधिकाऱ्यांनी गाडी आडवी लावूनही ट्रक चालकाने पळ काढला; मात्र सुमारे ६ तासांच्या थरारक पाठलागानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने चाकण-तळेगाव चौकात ट्रकला अडवून १ कोटी १३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वाहनचालक नफीस मेहबूब खान (वय ४०, रा. हरियाणा), मालक/पुरवठादार निलेश राठी (रा. खामगाव, जि. बुलढाणा), अरुण पाटील (रा. जळगाव), वाहन मालक मे. J.M.D. Enterprises (धुळे), वाहतूकदार संजय माटा (रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा (FSS Act) २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a) आणि ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने भिवंडी-ठाण्याच्या दिशेने जाणारा हा ट्रक संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने वळल्याचे निष्पन्न होताच, अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांच्या पथकाने राजगुरुनगर टोलनाक्यावर नाकाबंदी केली. ट्रक चालकाने गाडी न थांबवता वेगाने पुढे पळवली.
अधिकाऱ्यांनी तब्बल ६ तास मागोवा घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने चाकण-तळेगाव चौकात रात्री ८ वाजेच्या सुमारास ट्रकला घेराव घालून पकडले. रात्रभर चाललेल्या कागदपत्रांची पूर्तता व जप्तीची नोंद पूर्ण झाल्यानंतर सकाळी १० वाजता रीतसर फिर्याद नोंदवण्यात आली.
हा प्रकार केवळ अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन नसून सार्वजनिक आरोग्याशी खेळणारा एक संघटित गुन्हेगारी व्यापार असल्याने, या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी एफडीए प्रशासनाकडून पोलिसांकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहे.

“महाराष्ट्रात अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर आहे. ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.”
— तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य

जप्त केलेल्या मुद्देमालाचा सविस्तर तपशील:
क्र. प्रतिबंधित अन्नपदार्थ / साधन बाजाराभावाप्रमाणे किंमत (रु.)
१ रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला ₹२९,९५,२००/-
२ तुळशी रॉयल जाफरानी जर्दा ₹९,६०,०००/-
३ तानसेन सुगंधित पानमसाला ₹२४,९४,८००/-
४ टी.ओ. प्रिमियम जर्दा ₹२,६४,६००/-
५ आर.एम.डी. पानमसाला ₹२६,४०,०००/-
६ टाटा ट्रक (क्र. MH 18 BZ 2350) ₹२०,००,०००/-
– एकूण जप्त साठा किंमत ₹१,१३,५४,६००/-