
अनंत चतुर्दशीला मद्यविक्री बंदीचे आदेश धाब्यावर; कोरेगाव पार्क पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई!
पुणे: गणेश विसर्जन आणि अनंत चतुर्दशीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरात ‘ड्राय डे’ म्हणजेच सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्याचे कडक आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत कोरेगाव पार्क परिसरातील नामांकित बारमध्ये छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून ‘स्पीक लो’ बारच्या चालकावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री ००:०१ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस अंमलदार ओंकार अरुण ताड (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. हॉटेल चालक प्रसाद सूर्यभान बावके (वय ३९, रा. फॉर्च्यूनर सृष्टी, येवलेवाडी) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ७७ (बी) सह भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ (सरकारी आदेशाचे उल्लंघन) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पुणे-१) यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व मद्यविक्री दुकाने (FL-2, FL-3, CL-3, FLBR-2) पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे सक्त आदेश जारी केले होते.
असे अधिकृत सरकारी आदेश लागू असतानाही, आरोपी प्रसाद बावके यांच्या कोरेगाव पार्कमधील आपल्या ‘स्पीक लो’ या बारमध्ये मद्यविक्री परवान्याच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून ग्राहकांना दारू पुरवठा सुरू ठेवला होता. कोरेगाव पार्क पोलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान मध्यरात्री १२:०१ वाजता छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला.
घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडीक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सरकारी आदेशाचा भंग आणि दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास पोलीस शिपाई वेताळ करत आहेत.
#KoregaonPark #SpeakLowBar #PunePolice #DryDayRaid #AnantChaturdashi #PuneCrime #IllegalLiquorSale #BreakingNews #CrimeNews #MarathiNews



