
धारदार हत्याराने डोक्यात वार करून घरातील तोडफोड
पुणे: महंमदवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षण आणि कला क्षेत्रासाठी काम करणाऱ्या संस्थेचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी असलेल्या एका अर्धांगवायूग्रस्त ज्येष्ठाच्या घरात घुसून ५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी ८ ते १० गुंडांनी हल्ला चढवला. धारदार हत्याराने डोक्यात वार करून, लाकडी दांडक्याने व लोखंडी वस्तूने मारहाण करत घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २०:३० वाजेच्या सुमारास घडला.
दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रोड), आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी), इतर ८ ते १० अज्ञात आरोपी यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३०८(४) (खंडणी/उकळणे), ३३३ (घरफोडी/अतिक्रमण), १०९(१) (खून करण्याचा प्रयत्न – Attempt to Murder), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. विद्याधर दादासाहेब गायकवाड (वय ६५, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी डॉ. गायकवाड हे २०२१ मध्ये कॅन्टोन्मेंट रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले असून ‘करुणादीप फाउंडेशन’चे सदस्य आहेत. संस्थेने १ ते ३ सप्टेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित केला होता. या कार्यक्रमात आरोपी दिव्या शिंदे हिने विनानिमंत्रण सहभाग घेतला होता. त्यानंतर ती ५ लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी करत डॉ. गायकवाड यांना धमकावत होती.
२३ सप्टेंबर रोजी आरोपी आण्णा ढमढेरे याने भेटून “दिव्या ताईचे ५ लाख रुपये द्या, नाहीतर दोन दिवसांत मारहाण करण्यासाठी घरी लोक पाठवतो,” अशी धमकी दिली. डॉ. गायकवाड यांनी आपल्याला पॅरालिसिस झाला असून संस्थेच्या आर्थिक व्यवहाराशी माझा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. २४ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वाजता डॉ. गायकवाड घरी एकटेच आराम करत असताना, आण्णा ढमढेरे, दिव्या शिंदे आणि ८ ते १० गुंड घरात घुसले. त्यांनी कसलीही विचारपूस न करता वृद्ध डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. दिव्या शिंदे हिने “माझा माणूस पैसे मागायला आला होता, तू का दिले नाहीस? याला जिवंत सोडू नका, मारून टाका!” असे चिथावणी दिल्यानंतर एका गुंडाने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केले.
त्यानंतर लाकडी दांडके, कंबरेचे बेल्ट आणि घरातील लोखंडी पॉटने तोंडावर, डोळ्यावर आणि पाठीवर बेछूट मारहाण केली. त्यांना घाणेरडी शिवीगाळ करत दिव्या शिंदे हिने “याचे तुकडे करा अन् कुत्र्याला खाण्यासाठी टाका,” असे म्हणून दहशतीचे वातावरण निर्माण केले.
घटनेदरम्यान डॉ. गायकवाड यांचा मुलगा ओंकार आणि सून अपूर्वा घरी आले असता, आरोपींनी त्यांनाही दमदाटी केली आणि “पैसे देईपर्यंत तुमची टाटा कार (MH 12 US 3069) घेऊन जाणार,” असे लिहून घेतले. आरोपींनी घरातील साहित्याची तोडफोड केली व इलेक्ट्रिक कारचा चार्जरही तोडून नुकसान केले. दरम्यान, डॉ. गायकवाड यांचे भाऊ महेंद्र गायकवाड हे पोलिसांना घेऊन तातडीने तेथे पोहोचल्याने आरोपी पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांना काळेपडळ पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.
#Mohammadwadi #Hadapsar #PuneCrime #DivyaShinde #KalepadalPolice #ExtortionCase #AttemptToMurder #PunePolice #BreakingNews #CrimeNews #MarathiNews




