
२० लाखांची मागणी केल्याचा आरोप; यापूर्वी १५ हजार रुपये स्वीकारल्याचे पडताळणीत निष्पन्न; धानोरीतील रुग्णालयात ACBची कारवाई
पुणे, २६ सप्टेंबर : रुग्णालयातील कथित अनियमिततेवर कारवाई न करण्यासाठी तसेच वरिष्ठांकडे अहवाल न पाठविण्याच्या मोबदल्यात २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आणि त्यानंतर ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०), क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२), नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे महापालिका, असे ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
ACBच्या पुणे पथकाने २६ सप्टेंबर रोजी धानोरी, भैरवनगर येथील तक्रारदाराच्या रुग्णालयातील केबिनमध्ये सापळा रचून ही कारवाई केली. दुपारी १.४७ वाजता डॉ. चकोर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे ACBने प्रसिद्ध केलेल्या माहितीत नमूद आहे.
ACBच्या माहितीनुसार, तक्रारदार वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांच्या रुग्णालयातील कामकाजात अनियमितता असल्याबाबत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाची चौकशी डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांच्याकडे होती.
१८ सप्टेंबर रोजी डॉ. चकोर रुग्णालयाच्या पाहणीसाठी गेले असता, त्यांनी रुग्णालयातील त्रुटींचे निराकरण करावे, अन्यथा रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाईल, असे सांगितल्याचा आरोप आहे.
अहवाल पाठवायचा नसेल तर २० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावेळी तक्रारदाराकडे असलेले ३० हजार रुपये स्वीकारण्यात आले, तर उर्वरित रक्कम सोमवारी सांगतो, असे डॉ. चकोर यांनी म्हटल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी ACBच्या पुणे कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीची ACBकडून पडताळणी करण्यात आली. २४ सप्टेंबर रोजी धानोरीतील भैरवनगर येथे झालेल्या पडताळणीत डॉ. चकोर यांनी रुग्णालयातील त्रुटींच्या संदर्भात कारवाई कमी करण्यासाठी वरिष्ठांना नोटीस देण्याबाबत सांगितल्याचा आरोप आहे.
याच वेळी स्वतःसाठी आणि साहेबांसाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे ACBच्या पडताळणीत निष्पन्न झाल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. तसेच यापूर्वी तक्रारदाराकडून १५ हजार रुपये लाच स्वीकारल्याचे डॉ. चकोर यांनी मान्य केल्याचेही ACBने म्हटले आहे.
रुग्णालयातील केबिनमध्ये रंगेहाथ पकडले
त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी धानोरी, भैरवनगर येथील तक्रारदाराच्या रुग्णालयात सापळा रचण्यात आला. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांनी तक्रारदाराच्या केबिनमध्ये ५० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप असून, त्यांना ACBच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी डॉ. चकोर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील कलम ७ अंतर्गत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ACBने सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक-१ अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रवीण तावरे, महिला पोलीस हवालदार वनिता गोरे, पोलीस कॉन्स्टेबल आश्विन कुमकर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांच्या पथकाने कारवाई केली.
#Dhanori #PMC #ACBPune #BribeRaid #DnyaneshwarChakor #Vishrantwadi #PuneNews #CorruptionFreeIndia #BreakingNews #CrimeNews #MarathiNews




