
उच्चभ्रू परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची ‘हॉटेल क्राऊन प्लाझा’च्या रूममध्ये धाड; २ पीडित तरुणींची सुटका, ४ जणांवर गुन्हा दाखल
पुणे: मॉडेलिंग… सिनेमा… आणि जाहिरात क्षेत्रातील ग्लॅमरच्या पाठीमागे लागून पार्टी कल्चरमध्ये आलेल्या तरुणींना जाळ्यात ओढून त्यांना हायप्रोफाईल वेश्याव्यवसायात ओढण्याचे रॅकेट समोर आले आहे. मॉडेलिंग करणाऱ्या दोन उच्चशिक्षीत तरुणी पुण्यातील वेश्याव्यवसायात आढळून आल्या आहेत. अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगमवाडी परिसरातील ‘हॉटेल क्राऊन प्लाझा’मध्ये झालेल्या छापा कारवाईत ही बाब उघड झाली. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी २ पीडित तरुणींची सुटका केली असून, वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या ४ दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १४:२४ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
रोहन राजकुमार, राहुल, विवेक उर्फ मयंक कबीर, विक्रम उर्फ पियुष अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींचे पूर्ण नाव व पत्ते शोधण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार किशोर नानासाहेब भुजबळ (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३(१), (३), ३(५) सह अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) कायदा, १९५६ (PITA) चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुली मॉडेलिंग करतात. त्या मूळच्या दिल्लीमधील आहेत. छोट्यामोठ्या जाहिराती आणि फोटो शूट करिता त्या काम करतात. त्या दोघीही उच्च शिक्षित आहेत.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला बंडगार्डन रोडवरील संगमवाडी परिसरातील ‘हॉटेल क्राऊन प्लाझा’च्या ३ऱ्या मजल्यावरील रूम नं. ३२२ मध्ये काही एजन्टमार्फत तरुणींकडून बेकायदेशीररीत्या वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीसीच्या पथकाने छापा टाकला. आरोपींनी दोन पीडित महिलांना आर्थिक मदतीचे व पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या फायद्यासाठी देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचे निष्पन्न झाले.
तपासात उघड झाले की, आरोपी रोहन राजकुमार, राहुल, विवेक उर्फ मयंक कबीर आणि विक्रम उर्फ पियुष हे चारही दलाल संगनमताने या पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतील ठराविक रक्कम स्वतःसाठी ठेवून त्यावर ते स्वतःची उपजीविका भागवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पीडित तरुणींची सुरक्षित सुटका केली असून, त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे ३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक निरीक्षक सोनाली जगदाळे/साठे, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंडे, किशोर भुजबळ, सुरेखा आंधळे, मनिषा वायसे, फराह पठाण, वैशाली खेडेकर, वैशाली इंगळे, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.
आरोपी रोहन, राहुल, विवेक आणि विक्रम हे एजन्ट म्हणून काम करतात. मॉडेलिंग, फोटो शूट, जाहिरात क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणींना आरोपी गाठतात. विशेषतः विविध पार्ट्यामध्ये तरुणींना हेरून त्यांना सिनेसृष्टीत चांगले दिगदर्शक मिळवून देऊ, जाहिरातींमध्ये काम देऊ अशा भूलथापा मारतात. पैशांचे आणि ग्लॅमरच्या आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ओढले जाते. या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर हे करावंच लागतं असे सांगून या तरुणींना विविध शहरांमध्ये दहा ते १५ दिवसांकरिता फिरवले जाते. अनेकदा ग्राहकाकडून किंवा स्वतःच महागड्या हॉटेल्समध्ये रूम्स बुक केल्या जातात. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आरोपींचे हे रॅकेट उघड केले आहे.
#KoregaonPark #Sangamwadi #PuneCrime #HotelCrownPlaza #SexRacketBusted #AHTCPune #PITAAct #PunePolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews




