ट्रेंडिंगताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजविशेष लेखव्हिडिओ
क्राईम

पुण्यात २ सीएं कडून तब्बल ४,४२७ कोटींचा आयकर घोटाळा!

21 Sep 2026, 06:49 AM • TheLakhantalk
Spread the love

शेल कंपन्यांच्या आधारे परदेशात पाठवले पैसे; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल

बनावट १५ सीबी अन् १५ सीए प्रमाणापत्रांच्या आधारे शासनाची महाफसवणूक

पुणे: शेल (बोगस) कंपन्यांच्या नावाखाली परदेशी चलन पाठवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि खोटे ऑडिट रिपोर्ट तयार करून केंद्र शासनाचा तब्बल ४,४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपयांचा कर चुकवल्याचा अवाढव्य आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता तीन कंपन्यांच्या फायद्यासाठी सीएंनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करत ही फसवणूक केली. याप्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात दोन सनदी लेखापालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घोटाळा सन २०२२ ते वर्ष २०२६ या कालावधीत घडला.

एम.एस. ओडी अँड असोसिएट्स फर्मचे अंकुश कुमार सुरेशचंद बगरेचा (वय ३४, रा. आचलनगर, कोंढवा), मोहित शिवकुमार तोडी (वय ३३, रा. कोंढवा बुद्रुक) यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) (फसवणूक), २३४, २२९ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तन्मयी सुहास देसाई (वय ३१, रा. निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सी.ए. अंकुश कुमार बगरेचा आणि मोहित तोडी यांनी त्यांच्या ‘एम. एस. ओडी अँड असोसिएट्स’ या फर्मच्या माध्यमातून आणि इतर साथीदारांशी संगनमत करून हा घोटाळा केला. बागरेचा आणि तोडी यांनी बोगस/शेल कंपन्यांचे कुठल्याही व्यवहाराचे अधिकृत कागदपत्र सादर न करता किंवा त्यांची पडताळणी न करता परदेशी चलन पाठवण्यासाठी आवश्यक असणारे फॉर्म १५ सीबी हे खोटे प्रमाणपत्र तयार केले आणि ते खरे असल्याचे भासवून आयकर विभागास सादर केले.

तसेच फॉर्म १५ सीए हे प्रमाणपत्र तयार करण्याचे अधिकार नसतानाही त्यांनी ते बेकायदेशीररीत्या तयार करून आयकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड केले. अशा प्रकारे ३ कंपन्यांच्या फायद्यासाठी २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत एकूण ४,४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवून शासनाचा करोडो रुपयांचा कर चुकवून ही महाफसवणूक केली.

कोंढवा-येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, परदेशात पाठवण्यात आलेल्या पैशांचा मूळ स्रोत आणि संबंधित ३ कंपन्यांच्या संचालकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरु करण्यात आला आहे.