ट्रेंडिंगताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजविशेष लेखव्हिडिओ
ताज्या घडामोडी

सिटीप्राईड सिनेमागृहाला ११.२० लाखांचा दंड! विनापरवाना होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी पालिकेची धडक कारवाई

18 Sep 2026, 09:37 AM • TheLakhantalk
Spread the love

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून बजावण्यात आली नोटीस; काँग्रेसच्या तक्रारीनंतर आकाशचिन्ह विभागाचा हिसका!

पुणे: सातारा रस्त्यावरील नामांकित ‘सिटीप्राईड मल्टीप्लेक्स’ प्रशासनाला विनापरवाना आणि मान्य आकारमानापेक्षा जास्त मोठ्या मापाचे चित्रपट जाहिरात बोर्ड उभारणे चांगलेच महाग पडले आहे. पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या आकाशचिन्ह विभागाने नियमबाह्य जाहिरात बोर्डांवर कारवाई करत सिनेमागृह व्यवस्थापनाला तब्बल ११ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. काँग्रेस व्यापारी आघाडीचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत पालिकेच्या परवाना निरीक्षकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली आणि ही कारवाई केली.

मान्य आकारापेक्षा जास्त मापाचे नामफलक/चित्रपटांचे बोर्ड उभारणे, बोर्ड उभारणीसाठी पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेणे, तपासणी वेळी कोणतेही अधिकृत परवाना पत्र उपलब्ध करून न देणे अशा त्रुटी आढळून आल्या आहेत. आकाशचिन्ह विभागाच्या परवाना निरीक्षकांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत १०x२० आकाराचे (३ बोर्ड): ६०० चौ. फूट (शुल्क रु. ६,००,०००/-), १०x२० आकाराचे (४ बोर्ड): ४०० चौ. फूट, १०x२० आकाराचे (१ बोर्ड): ३०० चौ. फूट, १०x३० आकाराचे (१ बोर्ड): ३०० चौ. फूट, असे एकूण १,६०० चौ. फूट अनधिकृत फलक विनापरवाना लावल्याचे निष्पन्न झाले.

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी आणि परवाना निरीक्षकांनी सिटीप्राईड व्यवस्थापनाला नोटीस मिळताच ४ दिवसांच्या आत सुट्टीचे दिवस वगळून विहित ‘SP-7’ नमुन्यात अर्ज करून रीतसर परवाना घेण्याचे निर्देश दिले आहेत. या कालावधीत परवाना न घेतल्यास नियमानुसार ५ पट अतिरिक्त दंडाची आकारणी केली जाईल, तसेच सर्व अनधिकृत नामफलक जप्त करून तो खर्च सिनेमागृह मालकाकडून वसूल केला जाईल व पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पुणे महानगरपालिकेने दिला आहे.

 

#CityPride #SataraRoad #PMCAction #PuneNews #IllegalHoardings #Bibvewadi #PuneCivic #BreakingNews #MahaNews #MarathiNews