
मुंबई : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राज्यातील सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एकत्रित भूमिका घेत पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, सुरुवातीला काँग्रेसने राज्यसभेची जागा मिळावी अशी भूमिका मांडली होती. मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर आघाडीचा एकत्रित निर्णय घेण्यावर सहमती झाली. या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून अखेरीस काँग्रेसने पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आभार मानत सांगितले की, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला असून पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील सात राज्यसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील राजकीय समीकरणांमुळे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







