
पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये एटीएसची कारवाई : पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संबंधांच्या संशयावरून २३ ठिकाणी छापे; तब्बल ६४ जणांकडे चौकशी
लक्ष्मण मोरे
पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टी याच्याशी कथित संबंध असलेल्या संशयित नेटवर्कविरोधात राज्यभरात छापेमारी केली. राज्यभरात ६० पेक्षा अधिक ठिकाणी तरुणांना ताब्यात चौकशी करण्यात आली. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. या तरुणांच्या चौकशीमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून या तरुणांचे ‘ब्रेन वॉश’ करून त्यांना जाळ्यात ओढले जाते. त्यांना पैशांचे आमिष दाखवून सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकानणाची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवायला सांगितली जातात. त्यानंतर, काही दिवसांनी हा संपर्क तोडून टाकला जातो. एकंदरीत हा प्रकार वरवर पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टी याच्या नावाशी जोडलेला असला तरी हा खरा खेळ पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चा असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी ‘आज का आनंद’ला दिली.
‘एटीएस’ने पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील ६४ जणांची यादी तयार केलेली होती. त्यापैकी साधारण ५५ जणांकडे दिवसभरात चौकशी करण्यात आली. या कारवाईदरम्यान कोंढवा, चाकण, विश्रांतवाडी, उरुळी कांचन, येरवडा आदी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या तरूणांकडून खळबळजनक माहिती उजेडात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शाहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हाट्सअप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काही तरुणांशी संपर्क साधून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या माध्यमांतून नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली केल्या जात होत्या, याचा सखोल तपास सुरू आहे.
एटीएसच्या पथकांनी संशयितांच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी शोधमोहीम राबवून इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच तपासासाठी महत्त्वाची ठरू शकणारी कागदपत्रे जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची कसून चौकशी सुरू असून, डिजिटल पुरावे आणि ऑनलाइन संवादाची पडताळणी केली जात आहे.
तपास यंत्रणांनी अद्याप या प्रकरणात कोणालाही दोषी ठरवलेले नसून, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रकरणाचा संभाव्य राष्ट्रीय सुरक्षा, संघटित गुन्हेगारी किंवा इतर बेकायदेशीर कारवायांशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. एटीएसने नागरिकांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवताना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद ऑनलाइन हालचाल किंवा संदेश आढळल्यास त्वरित संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, तपास अद्याप सुरू असल्याने अधिकृत माहिती उपलब्ध होताच या प्रकरणातील पुढील तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
काय आहे मोडस ऑपरेंडी
सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले किंवा धार्मिकदृष्ट्या कट्टर असलेले तरुण सोशल मिडियावर हेरले जातात. विशेषत: इन्स्टाग्रामवर त्यांना खासगीत संपर्क साधला जातो. त्यांना इन्स्टाग्रामवर कॉल केले जातात. हा संपर्क एकदा प्रस्थापित झाला की व्हॉटसअप नंबरची देवाणघेवाण होते. या तरुणांना आंतरराष्ट्रीय नंबर असलेल्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाते. तेथे त्यांना अधिक ‘रॅडीकल’ बनवण्याचा प्रयत्न केला जातो. हे तरुण एकदा जाळ्यात आले की त्यांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवली जातात. विशेषत: पैशांचे आमिष दाखवले जाते. जाळ्यात अडकलेल्या तरुणांना पुढे संरक्षणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठिकाणांची माहिती पाठविण्यास तसेच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठविण्यास सांगितले जाते. कालांतराने त्यांच्याशी संपर्क तोडला जातो.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या तरूणांकडे याबाबत कसून चौकशी केली. ते नेमके कसे या गँगच्या संपर्कात आले. त्यांच्याशी कोणकोण संपर्कात होते? त्यांना कोणाकोणाती कामे सांगण्यात आली? कोणाच्या खात्यात किती पैसे जमा झाले अशी माहिती घेण्यात आली. त्यांच्या बँक खात्यांची पडताळणी देखील करण्यात आली.
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या तरुणांची समजूत घातली. त्यांना योग्य भाषेत समज देण्यात आली. तसेच, अशा प्रकारच्या गैरकृत्यांना बळी न पडण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची चौकशी झाल्यावर तरुणांना घरी सोडण्यात आले. मात्र, त्यांच्यावर एटीएसकडून बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
शाहजाद भट्टीच्या आडून ‘धुरंधर’ पॅटर्न?
पाकिस्तानी गॅंगस्टर शाहजाद भट्टीच्या आडून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अभिनेता रणवीर सिंगच्या धुरंधर सिनेमाप्रमाणे भारतात गॅंग निर्माण करून देशविघातक कारवायांसाठी वापरायच्या असा डाव असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या ‘आयएसआय’कडून भारतातील तरुणांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
#PuneATS #MaharashtraATS #NationalSecurity #CyberSecurity #ISINetwork #Wakad #Kondhwa #Chakan #CrimeNews #BreakingNews #PuneNews #MarathiNews




