
‘द वाईब’ प्रकल्पात कोट्यवधींचा गंडा; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू!
पुणे : पुण्यातील रिअल इस्टेट जगतात खळबळ उडवून देणारी घटना घडली असून कोरेगाव पार्कच्या बोट क्लब रोडसारख्या अत्यंत उच्चभ्रू परिसरात ‘द वाईब’ या बांधकाम प्रकल्पाच्या नावाखाली तब्बल १२ कोटी ५८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशिल अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०१७ पासून आजतागायत सुरू होता. हा प्रकार बोट क्लब रस्त्यावरील सुलक्स कार शोरूम आणि साऊथ मेन रोडवरील ‘द वाईब’ येथे घडला.
मे. गगन टायटॅनियम स्पेसेस एलएलपी (भागीदारी संस्था), सुशिल घनश्याम अग्रवाल (रा. प्लॉट नं. ६६, ज्योती आश्रमजवळ, बिबवेवाडी, कोंढवा रोड, लुल्लानगर), विशाल घनश्याम अग्रवाल (रा. ५८५/९, सॅलसबरी पार्क) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सज्जाद हुसेन गुलाम हुसेन गवरानी (रा. कल्पतरु गार्डन सोसायटी, बोट क्लब रोड) यांनी फिर्याद दिली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी दोन्ही आरोपी अग्रवाल बंधूंविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८, कलम ३१६ (२), कलम ३१६ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सुरुवातीला फिर्यादी सज्जाद गवरानी आणि त्यांच्या पत्नी हबिबा गवरानी यांनी आरोपींच्या मे. गगन लाईफ स्पेस एलएलपी या खात्यावर तब्बल ११ कोटी रुपये गुंतवले होते. ठरल्याप्रमाणे आरोपींनी काही काळ परतावा दिला, मात्र जेव्हा गवरानी यांनी आपली मूळ रक्कम परत मागितली, तेव्हा आरोपींनी “एवढी मोठी रक्कम एकत्रितपणे देता येणार नाही,” असे सांगून हात वर केले. रोकड देण्याऐवजी आरोपींनी त्यांच्या कोरेगाव पार्क येथील ‘द वाईब’ या बांधकाम प्रकल्पातील शॉप नंबर १४, १५ आणि ३४ अशी एकूण ३ दुकाने देण्याचे कबूल केले. त्यासाठी त्यांनी आर्टिकल ऑफ ॲग्रीमेंट करून दिले. या बदल्यात रजिस्ट्रेशन आणि जीएसटीपोटी त्यांनी गवरानी यांच्याकडून आणखी १ कोटी ५८ लाख ८८ हजार रुपये उकळले.
आरोपींनी ‘द वाईब’ या प्रोजेक्टसाठी आधीच एचडीएफसी बँकेकडून ३० कोटी रुपयांचे प्रोजेक्ट लोन (दि. २८/०८/२०१९ रोजी) मंजूर करून घेतले होते. तरीही गवरानी यांची फसवणूक करण्याच्या हेतूने १८ ऑक्टोबर २०१९ रोजी केलेल्या करारात “या मिळकतीवर कोणतेही कर्ज बोजा नाही,” असे खोटे नमूद करून फसवणूक केली. आजतागायत त्या जागेवर कोणतेही बांधकाम न करता किंवा दुकानांचा ताबा न देता एकूण १२.५८ कोटी रुपये हडप करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे करत आहेत.




