
तब्बल ३४२० किलो धोकादायक ‘क्लोरल हायड्रेट‘सह ५८०० लिटर केमिकल जप्त; ४ बडे गुन्हेगार जेरबंद!
१५ लाख लिटर विषारी दारू बनवण्याचा कट उधळला; १ कोटींचे ड्रग्ज बनवण्याचे मशीन जप्त, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची दीड महिन्यांच्या वॉचनंतर मोठी कारवाई!
पुणे/कुरकुंभ: पुणे ग्रामीण हद्दीतील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या एका आंतरराज्यीय ड्रग्ज आणि विषारी दारू निर्मितीच्या रॅकेटचा महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (कोल्हापूर कृती विभाग) पर्दाफाश केला आहे. ‘समर्थ लेबोरेटरीज’ या कंपनीवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ३४२० किलो प्रतिबंधित ‘क्लोरल हायड्रेट‘ (Chloral Hydrate) हा पिवळसर रंगाचा स्फटिक सदृश पदार्थ आणि ५८०० लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले आहे. या साठ्यापासून तब्बल १५ लाख लिटर विषारी दारू बनवली जाणार होती, जी पोलिसांनी वेळेत उधळून लावली. याप्रकरणी कारखान्याच्या मालकासह ४ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही धडक कारवाई २९ जून २०२६ रोजी करण्यात आली.

कारखान्याचा मूळ मालक किशोर दत्तात्रय सुर्वे (वय ५२), केमिकल बनवणारा मुख्य तज्ज्ञ/मास्टरमाइंड शैलेश विठ्ठल ठाकूर (वय ५५), नबी सरवर जमीर सिद्दीकी (वय ४०), आदेश विठ्ठल पाचांगणे (वय ५८) यांना अटक करण्यात आली आहे. सुर्वे याच्यावर यापूर्वीही अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कोल्हापूर कृती विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला गोपनीय माहिती मिळाली होती की, कुरकुंभ येथील समर्थ लेबोरेटरीजचा मालक व एनडीपीएस गुन्ह्यातील जुना आरोपी किशोर सुर्वे याच्या फॅक्टरी परिसरात शैलेश ठाकूर हा चोरट्या पद्धतीने अत्यंत धोकादायक ‘एमडी’ (मेफेड्रॉन) हे ड्रग्ज बनवत आहे. या माहितीच्या आधारे टास्क फोर्सच्या पथकाने सलग दीड महिने या फॅक्टरी परिसरावर अत्यंत बारीक लक्ष (वॉच) ठेवले होते. अखेर २९ जून रोजी योग्य वेळ साधून पोलिसांनी फॅक्टरीवर एकाच वेळी छापा टाकला.

छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेल्या पिवळसर स्फटिक सदृश पदार्थाचे नमुने न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, हा पदार्थ मानवी जीवाला अत्यंत घातक असलेले प्रतिबंधित ‘क्लोरल हायडरेट’ असल्याचे निष्पन्न झाले. या रसायनाचा वापर करून १५ लाख लिटर विषारी दारू बाजारात आणण्याचा आरोपींचा कट होता, ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण धोक्यात आले असते.

ही धडाकेबाज कामगिरी अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य) तथा विशेष पोलीस महानिरीक्षक (अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स) सुनील रामानंद, पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक (कृती), आणि अपर पोलीस अधीक्षक (कृती) यांच्या थेट नियंत्रण व मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच, प्रत्यक्ष घटनास्थळी कोल्हापूर कृती विभागाचे पोलीस उप अधीक्षक, पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी हा धाडसी छापा टाकून महाराष्ट्रातील ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले आहे.




