
लाकडी बांबू व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत केले ‘जबर जखमी’; ३ जणांवर गुन्हा दाखल
आंबेगावच्या सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २० कार्यालयात राडा
आंबेगाव: शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आंबेगाव येथील ‘सह दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र. २०’ मध्ये शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यावर वकिलासह तीन जणांनी लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दस्त नोंदणी न केल्याच्या कारणावरून आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणून अधिकाऱ्याच्या छातीवर जबर प्रहार केले, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी १७:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
एड. योगेश रामदास कापरे (वय ३५), तुषार रामदास कापरे (वय ३५), महेश नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रविंद्र नामदेव कोळी (वय ४६, रा. जाधव प्रेस्टीज, जांभुळवाडी दत्तनगर रोड, आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम कलम १३२, कलम १२१(२), कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र कोळी हे आंबेगाव येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात (हवेली क्र. २०) वरिष्ठ लिपिक असून त्यांच्याकडे सध्या सहदुय्यम निबंधकपदाचा कार्यभार आहे. शुक्रवारी ते दैनंदिन शासकीय कर्तव्य बजावत होते. दरम्यान, आरोपी योगेश कापरे, तुषार कापरे आणि त्यांचा साथीदार महेश हे तिथे आले.
आरोपींनी आणलेला एक दस्त (कागदपत्र) काही कारणास्तव नोंदणी केला गेला नाही. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी थेट कार्यालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी अधिकारी कोळी यांना अर्वाच्य भाषेत बोलून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वाद एवढा वाढला की, आरोपींनी थेट कोळी यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी छातीवर जबर मारहाण केली आणि सोबत आणलेल्या लाकडी बांबूने मारून त्यांना रक्तबंबाळ व जबर जखमी केले. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी तेथून पसार झाले.
शासकीय अधिकाऱ्यावर कार्यालयातच हल्ला झाल्याची माहिती मिळताच प्रचंड खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, आंबेगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने ताफ्यासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व कडक कारवाईचे आदेश दिले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवधर करत आहेत.
#Ambegaon #PuneCrime #GovtOfficialAssault #SubRegistrarOffice #PunePolice #CrimeNews #BreakingNews #LawAndOrder #Haveli20 #MarathiNews




