
‘आताच्या आता निघ, नाहीतर इथेच ठोकीन!’ : हॉस्पिटलच्या सर्वोच्च अधिकाऱ्याची गुंडगिरी?
हडपसर (पुणे): हडपसर येथील प्रसिद्ध ‘विलू पूनावाला हॉस्पिटल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर्या लजपतराय यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला त्यांच्याच केबीनमध्ये पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपचारादरम्यान मरण पावलेल्या एका ६० वर्षीय महिलेचे बिल कमी करण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याला, “मी मोठ्या लोकांचे बिल कमी करत नाही, तुझे कसे करू? आताच्या आता निघ नाहीतर इथेच ठोकीन,” असा दम डॉ. लजपतराय यांनी भरला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवार, दिनांक १६ जुलै २०२६ रोजी रात्री ०७:३० वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील सीओओ यांच्या केबीनमध्ये घडली.
डॉ. आर्या लजपतराय (वय ५८ वर्षे, पद- सी.ओ.ओ., विलू पूनावाला हॉस्पीटल, हडपसर), हॉस्पिटलचा बाउन्सर / सिक्युरिटी गार्ड केतन वायकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३), कलम ३५२, शस्त्र अधिनियम कलम ३० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतीक उत्तम कांबळे (वय ३३, रा. २०६०, जान मोहम्मद स्ट्रीट, कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी प्रतीक कांबळे हे शहरात सामाजिक कार्य करतात. १६ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांचा फुरसुंगी येथील मित्र राजू विष्णू खुडे याने फोन करून सांगितले की, “माझी आई सुशिला खुडे हिचा विलू पूनावाला हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आम्ही आतापर्यंत २ लाख ४० हजार रुपये बिल भरले आहे. तरीही हॉस्पिटलचे अधिकारी आर्या लजपतराय हे आणखी २ लाख २३ हजार रुपयांचे बिल भरल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार देत आहेत.”
मित्राला मदत करण्यासाठी प्रतीक कांबळे आणि त्यांचा चुलत भाऊ ऋषिकेश कांबळे रात्री ७:३० वाजता हॉस्पिटलमध्ये गेले. तिथल्या केतन वायकर नावाच्या बाउन्सरने त्यांना पहिल्या मजल्यावरील डॉ. आर्या लजपतराय यांच्या केबीनमध्ये नेले. प्रतीक यांनी बिलात सवलत (कन्सेशन) देण्याची विनंती केली असता, डॉ. लजपतराय यांनी उद्धटपणे नकार दिला आणि सांगितले की, “मी मोठ-मोठ्या लोकांचे बिल कमी करत नाही.”
त्यानंतरही प्रतीक यांनी पैसे नसल्याचे सांगून पुन्हा विनंती केली असता, डॉ. लजपतराय यांनी अरेरावी आणि शिवीगाळ सुरू केली. ते फिर्यादीला म्हणाले, “तू सुद्धा कांबळे आहेस आणि आमदार कांबळे सुद्धा माझ्या अत्यंत जवळचे आहेत.” एवढे बोलून त्यांनी तावातावाने टेबलच्या ड्रॉवरमधून स्वतःची पिस्तूल बाहेर काढली.
प्रतीक यांनी “पिस्तूलची काय धमकी देताय?” असे विचारताच डॉ. लजपतराय अधिकच रागावले. त्यांनी हातातली पिस्तूल थेट प्रतीक कांबळे यांच्या छातीवर लावली आणि ओरडून म्हणाले, “तुझे एक रुपया सुद्धा बिल कमी करणार नाही, तू आताच्या आता येथून निघून जा, नाहीतर इथेच ठोकीन!” हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेला बाउन्सर केतन वायकर याने तात्काळ डॉ. लजपतराय यांना पिस्तूल आणि गोळ्यांच्या पाऊचसह केबीनबाहेर नेले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या प्रतीक कांबळे यांनी केबीनबाहेर येऊन तत्काळ ‘डायल ११२’ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. हडपसर पोलीस ठाण्याचे पथक काही वेळातच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.




