
जुन्या कात्रज बोगद्याजवळील हत्याकांडाचा राजगड अन् एलसीबीकडून छडा; ४ जणांना बेड्या, पिस्तूल जप्त
सदाशिव पेठेतील तरुणाने साथीदारांच्या मदतीने केला बापाच्या मारेकऱ्याचा गेम; तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
राजगड/भोर: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगद्याजवळ हॉटेल आमराई समोर घडलेल्या एका सनसनाटी खून प्रकरणाचा राजगड पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ७२ तासांत उलगडा केला आहे. सन २००३ मध्ये आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी मुख्य आरोपीने स्वतःच्या ३ साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने तोंडावर, डोक्यावर वार करून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह चारही आरोपींना बेड्या ठोकल्या असून एका आरोपीकडून बेकायदेशीर गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, मूळ रा. कुरण, पानशेत, ता. वेल्हा; सध्या रा. भैरवनाथ मंदिराजवळ, मुंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. मुख्य सूत्रधार मंथन दिनेश वैद्य (रा. सदाशिव पेठ, जोशीवाडा), सौरभ सागर परदेशी (रा. सदाशिव पेठ, जोशीवाडा), मिझान गॅसउद्दीन शेख (रा. पर्वती दर्शन, पोलीस चौकीजवळ), संदीप बाबूलाल कोरी (रा. ३८/४, पर्वती दर्शन, साईबाबा मंदिरासमोर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गौरव चंद्रकांत झेंडे (वय ३१, रा. १३ ताडीवाला रोड) यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना शनिवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी रात्री २२:२० वाजेच्या पूर्वी घडली होती.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि राजगड पोलिसांना समांतर तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास गतीमान करण्यात आला. तांत्रिक तपासादरम्यान मिळालेल्या सुगाव्यावरून पोलिसांनी आधी मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी या दोघांना १४ जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखवून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार मिझान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली.
तपासात उघड झाले की, मुख्य आरोपी मंथन वैद्य याचे वडील दिनेश वैद्य यांचा सन २००३ मध्ये मयत संजय कडू-देशमुख याने खून केला होता. वडिलांच्या खुनाचा राग मंथनच्या मनात गेली २३-२४ वर्षे धगधगत होता. याच जुन्या वैमनस्याचा व वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने संजय देशमुखची रेकी करून कात्रज बोगद्याजवळ मित्रांच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करत त्याची निघृण हत्या केली. तसेच, आरोपी संदीप कोरी याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक बेकायदेशीर गावठी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे सापडली, ज्यावरून त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर (सासवड विभाग), एलसीबी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, राजगडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहायक निरीक्षक चेतन मछले, पोउपनि युवराज धोंडे, तसेच स.फो. संतोष तोडकर, पो.हवा. राजू मोमीन, संतोष भापकर, विशाल भोरडे, किरण बर्काले, निलेश राणे, अडवाल, नाना मदने, गायकवाड, मयुर निंबाळकर, राजेंद्र मुंढे, प्रधान, कोंढाळकर, मेस्त्री, भालेराव, शिंदे आणि नलावडे यांनी केली.
#KatrajTunnel #PuneCrime #RajgadPolice #PuneRuralPolice #MurderCaseSolved #RevengeMurder #LCBPune #CrimeNews #BreakingNews #MarathiNews




