
बड्या अभियंत्यासह दोघांवर गुन्हा : सरकारी शिक्के अन् थेट मुख्य अभियंत्यांचीच बनावट सही!
श्री. एव्हिटा कन्स्ट्रक्शन प्रा. लि.’ या कंपनीला काम देण्यासाठी बनावटगिरी
पुणे: पुण्यातील शासकीय ‘सिस्टीम’चा गैरवापर करून चक्क बनावट सरकारी दस्तऐवज तयार करणाऱ्या एका रॅकेटचा काळा कारनामा समोर आला आहे. ‘श्री. एव्हिटा कन्स्ट्रक्शन प्रा. लि.’ या बिल्डर कंपनीला मावळमधील कालव्यावर पूल बांधण्याची मंजुरी मिळवून देण्यासाठी, थेट ‘महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ’ (सिंचन भवन) येथील मुख्य अभियंत्यांची बनावट सही आणि बनावट जावक क्रमांक टाकून हुबेहूब सरकारी मंजुरी पत्र तयार करण्यात आले. या प्रकरणात खात्यांतर्गत चौकशीनंतर महामंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता आणि एका सल्लागार कंपनीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जलसंपदा विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा प्रकार ७ जानेवारी २०२६ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत सिंचन भवन, मंगळवार पेठ येथे घडला.
गौरव देवराव डहाळे (सूत्रधार अँड कंपनीचे काम पाहणारा कन्सलटंट), राजेंद्र विष्णु सावंत (सहाय्यक अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, सिंचन भवन) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मुख्य अभियंता श्रीजीत प्रविण थोरात (वय ३५, रा. ग्रीन पार्क सोसायटी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३६ (३) (बनावट सरकारी दस्तऐवज किंवा रेकॉर्ड तयार करणे), कलम ३३९ (बनावट दस्तऐवज खरा भासवून वापरणे), कलम ३१८ (४) (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्ता हस्तांतरित करण्यास प्रवृत्त करणे), कलम ३ (५), समान हेतूने दोघांनी मिळून कट रचून गुन्हा करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘श्री. एव्हिटा कन्स्ट्रक्शन प्रा. लि. पुणे’ या कंपनीला मौजे दारुंब्रे (ता. मावळ, जि. पुणे) येथील गट नं. १९३ आणि इतर मिळकतींमधील कासारसाई डाव्या कालव्यावरून स्वतःच्या खर्चाने पूल बांधायचा होता. यासाठी त्यांना जलसंपदा विभाग, पुणे यांच्याकडून अधिकृत परवानगी आणि इतर शासकीय मंजुरी हवी होती. हे सरकारी काम करून घेण्यासाठी बिल्डर कंपनीने आरोपी क्रमांक १ गौरव देवराव डहाळे याला ‘कन्सलटंट’ (सल्लागार) म्हणून काम दिले होते.
कन्सलटंट गौरव डहाळे आणि कृष्णा खोरे महामंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता राजेंद्र विष्णु सावंत यांनी आपापसात संगनमत करून एक भयंकर कट रचला. अधिकृत मंजुरी मिळण्यात अडचणी येत असल्याने त्यांनी स्वतःच सिंचन भवन कार्यालयात बसून एक बनावट मंजुरी पत्र टाईप केले. त्यावर अधिकृत सरकारी दिसावा म्हणून बनावट जावक क्रमांक (मुअ (जस)/काउ-२/उअ-५/प्रशा-६/(१३१/२०२५)/ ६८८८ /२०२५ दि.०७/०१/२०२६) टाकला. त्यावर मुख्य अभियंत्यांची हुबेहूब बनावट स्वाक्षरी केली. हा बनावट सरकारी दस्तऐवज पूर्णपणे खरा असल्याचे भासवून तो ‘श्री. एव्हिटा कन्स्ट्रक्शन’ कंपनीला सुपूर्द केला. हा दस्तऐवज जेव्हा तपासणीसाठी वरिष्ठ पातळीवर गेला, तेव्हा मुख्य अभियंत्यांनी या पत्रावर आपण सहीच केली नसल्याचे स्पष्ट केले, आणि या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. या हायप्रोफाइल आणि तांत्रिक गुन्ह्याचा पुढील तपास समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे करत आहेत.
#PuneCrime #SinchanBhavan #MKVDC #GovernmentScam #ForgeryCase #PunePolice #SamarthPolice #MavalNews #BreakingNews #CrimeNews #MarathiNews




