
आरटीआय आणि व्हॉटस्ॲप स्टेटसचा हत्यार म्हणून वापर
पुणे : माहितीचा अधिकार आणि व्हॉटस्ॲप स्टेटसचा गैरवापर करून शिक्षण संस्थेला वेठीस धरणाऱ्या एक ब्लॅकमेलिंगचा प्रकार शिरूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ‘श्री. वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’ला युनिव्हर्सिटी (विद्यापीठ) स्तर आणि शिक्षण विभागाकडे खोट्या तक्रारी करून बदनाम करण्याची धमकी देत तब्बल ७० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० जुलै २०२५ ते १६ जून २०२६ या कालावधीत घडला.
संतोष यशवंत आडसूळ (रा. बोरी पारधी, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शरद वसंतराव फराटे (वय ४८, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी आडसूळ विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद वसंतराव फराटे पाटील यांच्या मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला आणि त्यांच्याशी निगडित शिक्षण संस्थांना आरोपी संतोष आडसूळ याने टार्गेट केले होते. आरोपीने संस्थेकडून मोठी रक्कम उकळण्यासाठी एक पद्धतशीर कट रचला होता.
आरोपीने संस्थेला धमकी दिली होती की, जर ७० लाख रुपये दिले नाहीत, तर विद्यापीठ स्तरावर आणि संबंधित उच्च शिक्षण विभागाकडे पत्राद्वारे व ई-मेलद्वारे संस्थेविरुद्ध खोट्या आणि बनावट तक्रारी करेल. माहिती अधिकाराचा गैरवापर करून संस्थेची आणि अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती मागवून ती सार्वजनिक करण्याची धमकी देत होता. व्हॉटस्ॲप स्टेटसच्या माध्यमातून विविध शिखर परिषदा आणि कायदेशीर चौकशीची भीती घालून संस्थेची पत घसरवण्याचा प्रयत्न करत होता. महाविद्यालयाच्या गेटवर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीने ही रक्कम मागून संस्थेला मानसिक व आर्थिक वेठीस धरल्याने अखेर फराटे पाटील प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.



