
जिवाच्या भीतीने घर सोडलेल्या ग्रामस्थांच्या घरात ११ लाखांची घरफोडी
लोणावळा/मावळ: मुसळधार पाऊस आणि डोंगरावरुन दरड कोसळण्याच्या भीतीच्या छायेत असलेल्या मावळ तालुक्यातील पाटण गावात एकीकडे ग्रामस्थ जीवाच्या भीतीने घरे सोडून सुरक्षित स्थळी जात असताना, दुसरीकडे नराधम चोरांनी त्यांच्या या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आहे. संपूर्ण गाव रिकामे असल्याचा फायदा उठवून अज्ञात चोरट्यांनी गावात धुमाकूळ घालत तीन घरे फोडली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोठी रोकड आणि चक्क देवीचा चांदीचा मुकुट व छत्री असा एकूण १० लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवार, दिनांक ०६ जुलै २०२६ पासून ते गुरुवार, दिनांक ०९ जुलै २०२६ च्या दरम्यान घडली.
याप्रकरणी संतोष खंडू तिकोणे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी तिकोने यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्याचा नेकलेस, सुभाष बबन गाडेकर यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र व अंगठया, सोनासाखळी, सोन्याच्या मण्याची मोहनमाळ, चांदीचे जोडवे, टायटन कंपनीची ३ घड्याळे, तर संदीप गोविंद वाळूज यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्याचा हार, सव्वा किलो वजनाची चांदीची छत्री, ९० ग्रॅम वजनाचा देवीचा चांदीचा मुकूट लंपास केला.
अज्ञात चोरट्यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५, कलम ३३१ (३), कलम ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आपत्तीच्या काळात गावकऱ्यांची घरे लुटल्यामुळे मावळ तालुक्यात तीव्र संतापाची लाट आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या संवेदनशील घरफोडीचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.
नैसर्गिक संकटामुळे हवालदील झालेल्या मावळच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना निसर्गाने तर झोडपलेच, पण राहिलेली कसर या नराधम चोरांनी पूर्ण केली. देवाच्या मूर्तीवरचा मुकुट आणि छत्रीही न सोडणाऱ्या या चोरांना पोलिसांनी भरचौकात आणून अद्दल घडवली पाहिजे!
#Lonavala #Maval #PatanVillage #Burglary #CrimeNews #PunePolice #LonavalaRuralPolice #Monsoon2026 #BreakingNews #MarathiNews





