
पुणे: पुणे पोलीस दलातील गुन्हेगारांना थरथरवणारे आणि ‘गन मॅन’ म्हणून विशेष ओळख असलेले धडाकेबाज पोलीस हवालदार शैलेश जगताप यांच्यावर दाखल करण्यात आलेली खंडणीची तक्रार पूर्णपणे खोटी, बनावट आणि पूर्वनियोजित कट रचून केल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते. यावर आता पुणे सत्र न्यायालयानेही अंतिम शिक्कामोर्तब केल्याने शैलेश जगताप यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २९ जानेवारी २०२४ रोजीच हा खटला रद्द करण्याचे आदेश दिले होते, ज्यावर आता ८ जुलै २०२६ रोजी पुणे सत्र न्यायालयाने अंतिम कायदेशीर शिक्कामोर्तब केले आहे.
पोलीस हवालदार शैलेश जगताप हे पुणे पोलीस दलातील सर्वात आक्रमक आणि डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जात होते. गुन्हेगारी जगतात केवळ त्यांच्या नावाची दहशत होती. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी २५० पेक्षा जास्त बेकायदेशीर अग्नीशस्त्रे (गावठी कट्टे, पिस्तूल आणि जिवंत काडतुसे) जप्त करून रेकॉर्ड केला होता. तसेच, ५ कोटी रुपयांचे ड्रग्ज (अंमली पदार्थ) पकडून शहरातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे मोडले होते. २२५ पेक्षा जास्त शासकीय बक्षिसे आणि पुरस्कार मिळवून पोलीस दलाची मान उंचावली होती.
याच काळात कथित गुन्हेगार राहुल खेत्रे याने जगताप यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामुळे शैलेश जगताप यांच्या कारकीर्दीला अचानक ब्रेक लागला. त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आणि काही काळ तुरुंगातही काढावा लागला. त्यानंतर देखील तक्रारींचा ससेमिरा सुरूच होता. त्यामुळे त्यांना पोलीस सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना जगताप यांनी थेट पोलीस दलातील अंतर्गत राजकारण आणि वरिष्ठ पातळीवरील षड्यंत्रच या सर्व परिस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
उच्च आणि सत्र न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासल्यानंतर, ही तक्रार खोटी असल्याचे ताशेरे ओढले. या निकालामुळे आता जगताप यांना त्यांचा गमावलेला सन्मान परत मिळणार का असा प्रश्न आहे. त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा मार्ग या निकालामुळे मोकळा झाला आहे का? की त्यांना पुन्हा त्यासाठी संघर्ष करावा लागणार असा प्रश्न आहे.
#ShaileshJagtap #PunePolice #JusticeServed #CourtVerdict #PuneNews #BreakingNews #LawAndOrder #PoliceForce #MarathiNews #PuneCrime





