
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राबवण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या शासकीय कामकाजात हलगर्जीपणा आणि आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या बीएलओ नियुक्तीच्या अधिकृत आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकाने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
वैभव साहेबराव फटांगरे आणि महेश गोपीनाथ माळी अशी गुंजा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महापालिकेचे वरिष्ठ लिपिक बळीराम बबन कोढांळकर (वय ५०, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशान्वये सध्या पुणे शहरात ‘छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’ सुरू आहे. या राष्ट्रीय कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अर्चना निकम यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मधील कलम १३-२ (ब) नुसार शिक्षक, उपशिक्षक तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
या अंतर्गत आरोपी वैभव फटांगरे आणि महेश माळी यांची कै. नारायणराव नवले प्राथमिक शाळा क्र. ५६ बी येथे बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांना त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या भागात मतदार यादीचे पडताळणीचे काम करण्याचे स्पष्ट आदेश होते. मात्र, १५ मे ते ९ जून या संपूर्ण कालावधीत त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही व निवडणूक कामकाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
#PuneNews #ElectionCommission #PMC #BLODuty #ActionTaken #PuneAdministration #SinhagadRoad #VoterList #BreakingNews #MarathiNews







