
‘आयएनएस शिवाजी’ परिसरातील मोठी कारवाई
पुणे : भारतीय नौदलामध्ये कोणत्याही पदावर नोकरीला नसताना, नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा गणवेश (युनिफॉर्म) परिधान करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका ३२ वर्षीय भामट्याला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने “माझे नौदलात मोठे वजन आहे,” असे भासवून पाच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नौदलात नोकरीला लावण्याचे खोटे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून ऑनलाईन स्वरूपात लाखो रुपये उकळले. याप्रकरणी लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’ केंद्रात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून देशद्रोहासारख्या गंभीर कलमांसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार, दिनांक ०८ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मौजे भुशी, आय.एन.एस. शिवाजी गेटजवळ करण्यात आली असून, लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आकाश काशीनाथ डांगे (वय ३२, रा. बाडाळी बुद्रुक, पो. चासकल, ता. फलटण, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कैलास बबन नलावडे (वय ५६, रा. ७३/२, आय.एन.एस. शिवाजी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीवर सैन्य दलाच्या नावाचा गैरवापर केल्यामुळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४ (शासकीय किंवा लष्करी कर्मचाऱ्याचा खोटा वेषांतर/सोंग वेश धारण करणे), कलम २०५ (फसवणुकीच्या उद्देशाने चुकीची ओळख सांगणे), कलम ३१८ (४) (फसवणूक), शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ६ (प्रतिबंधित लष्करी क्षेत्रात अनधिकृत प्रवेश करणे किंवा सैनिकाचा खोटा गणवेश वापरणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश डांगे याने स्वतः नौदलाच्या अधिकाऱ्याचा पांढरा गणवेश परिधान करून अनेक फोटो काढले होते आणि ते त्याने आपल्या मोबाईलमध्ये ठेवले होते. तो तरुणांना हे फोटो दाखवून “मी नौदलात मोठा अधिकारी आहे,” असे सांगायचा. त्याच्या गोड बोलण्याला फसून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पाच तरुणांनी नौदलात नोकरी मिळवण्यासाठी त्याला ऑनलाईन पेमेंटद्वारे एकूण २५ लाख २५ हजार रुपये पाठवले.
जयकुमार उदय पवार (वय २३, रा. टिटवेवाडी, ता. व जि. सातारा), विशाल विलास पाटील (वय ३०, रा. पेठ पाळमाळ, जि. सांगली), विनोद विलास सराटे (वय २१, रा. हरकखेडा, ता. अंबड, जि. जालना), विजय कृष्णा पाटील (वय २३, रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर), रोहित बबन कांबळे (वय २४, रा. सोनुर्ले, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. आरोपीने या सर्वांकडून पैसे उकळले, परंतु कोणालाही नोकरीला लावले नाही. संशय आल्यामुळे आय.एन.एस. शिवाजी येथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्याचे बिंग फुटले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
लष्करी तळाच्या परिसरात तोतया अधिकारी फिरत असल्यामुळे लोणावळा शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे. आरोपीने नौदलाचा अधिकृत युनिफॉर्म आणि बॅजेस कुठून खरेदी केले, याचा शोध घेतला जात आहे. या आंतरजिल्हा फसवणुकीच्या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड करत आहेत.
==यापूर्वीचे आहेत गुन्हे दाखल==
जून 2023
भारतीय नौदलातील अधिकारी असल्याचे भासवून आकाश डांगे याने आयएनएस शिवाजी येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करण्याचा यापूर्वी देखील प्रयत्न केला आहे. त्याला जून 2023 मध्ये त्याच्या दोन साथीदारांसह पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. आकाश डांगे सोबत जयराज आनंदराव चव्हाण (वय २६) आणि अभय काकडे (वय २६) यांना अटक झाली होती. हे तिघेही सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी आहेत. त्यावेळी पोलिसांनी डांगेच्या ताब्यातून एक कार, नौदलाचा गणवेश तसेच इतर साहित्य जप्त केले होते. याप्रकरणी लोणावळ्यातील बंगारवाडी परिसरात राहणाऱ्या आणि नोटरी म्हणून कार्यरत असलेल्या अॅड. ऐश्वर्या लेंढघर यांनी फिर्याद दिली होती. त्याने सप्टेंबर २०२२ मध्ये नौदल अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी लेंढघर यांच्या कार्यालयात जाऊन स्वतःला नौदलातील कमांडंट दर्जाचा अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्याने लेंढघर यांच्या नातेवाईकांसह एकूण १९ जणांना लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी येथे नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्येकाकडून ३ लाख रुपये मागितले होते.
जून 2020
आकाश डांगे याच्यावर दौंड येथील एका तरुणाची ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा जून 2020 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यासह नितीन तानाजी जाधव (वय ३०, रा. कल्पनानगर, बारामती) याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. या दोघांनी पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव तसेच विदर्भातील अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केली होती. २०१८ मध्ये या दोघांनी दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील बेरोजगार किशोर जाधव याला भारतीय नौदलात स्टोअर कीपरची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये उकळले. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट ई-मेल आयडी तयार केला तसेच बनावट प्रवेशपत्र, वैद्यकीय कागदपत्रे आणि प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) तयार करून त्याची लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी येथे नियुक्ती झाल्याचे भासवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीशी सर्व संपर्क तोडला होता. घटनेनंतर दोन वर्षांनी फिर्यादीने पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
#LonavalaCrime #INSShivaji #FakeNavyOfficer #PunePolice #JobScam #CrimeNews #BreakingNews #LonavalaNews #PuneCrime #IndianNavy #MarathiNews





