
डान्स करताना वादातून तरुणाच्या कपाळावर फोडली बिअरची बाटली; तरुणीला शिवीगाळ करत मारहाण
हडपसर/मगरपट्टा: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मगरपट्टा परिसरातील नामांकित ‘हॉटेल कल्ट हाउस’मध्ये रविवारी मध्यरात्री तरुणांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. डान्स फ्लोअरवर गाण्यांवर थिरकताना झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाले. लाल टी-शर्ट घातलेल्या आरोपीने व त्याच्या साथीदारांनी एका तरुणाच्या कपाळावर बिअरची बाटली मारून त्याला गंभीर जखमी केले, तर दुसऱ्या मित्राचा शर्ट फाडून सोबत असलेल्या तरुणीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन मुख्य आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
शुभंकर पंकज पाटील (वय २४, रा. श्री स्वामी समर्थ सोसायटी, सुस रोड, पाषाण), कृष्णराज धनाजीराव जाचक (वय २४, रा. जाचक फार्म, लिमटेक, पिंपळी, ता. बारामती) यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी मुळची अकोला जिल्ह्यातील राहणारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही मित्र इम्रान हैदर, अमीन इस्माईल मुहोम्मद आणि मैत्रीणीसह शनिवारी रात्री मगरपट्ट्यातील ‘कल्ट हाउस’ या पबमध्ये पार्टी व डान्ससाठी गेली होती. रविवारच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हे सर्वजण डान्स फ्लोअरवर डान्स करत असताना, तेथे लाल टी-शर्ट घातलेला आरोपी शुभंकर पाटील, त्याचा मित्र कृष्णराज जाचक आणि त्यांचा तिसरा साथीदार आले. डान्स करताना एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला अंगावर धावून जात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि तोंडावर हाताने जोरात बुक्का मारला.
फिर्यादीचा मित्र इम्रान हैदर हा भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती करायला गेला असता, आरोपीने थेट हातातील काचेची बिअरची बाटली इम्रानच्या कपाळावर जोरात मारली. बाटली फुटून इम्रानच्या कपाळावर खोल जखम झाली आणि तो रक्तबंबाळ झाला. आरोपींनी फिर्यादीचा दुसरा मित्र अमीन मुहोम्मद यालाही बेदम मारहाण करून त्याचा शर्ट फाडून टाकला. यानंतर आरोपींनी सोबत असलेल्या तरुणीला शिवीगाळ करत पबबाहेर निघून जाण्याची, अन्यथा बघून घेण्याची धमकी दिली.
माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार बी. आर. खटके करत आहेत.
#Magarpatta #CultHousePub #Hadapsar #PuneCrime #PubBrawl #PunePolice #NightlifeCrime #BreakingNews #CrimeNews #MarathiNews





