
ऊसाच्या शेतात सापडला मृतदेह
पिंपळसुटी/शिरूर: शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्याची एक भीषण आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या एका ५ वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर बिबट्याने अचानक हल्ला करून तिला गोठ्यातून थेट उचलून ऊसाच्या शेतात ओढून नेले. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मोठ्याने आरडाओरडा करत वनविभागाच्या मदतीने शोध घेऊन मुलीला रुग्णालयात पोहोचवले, परंतु डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री ०२:४० वाजण्याच्या सुमारास घडली.
भाग्यश्री संदीप वारे (वय ०५, मुळ रा. करोडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. पिंपळसुटी, ता. शिरूर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांना बाबासाहेब कोंडीबा वारे (वय ३६) यांनी माहिती कळवली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वारे कुटुंब हे मजुरीच्या कामासाठी शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे आले असून, स्थानिक शेतकरी मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या शेतातील गोठ्यात वास्तव्यास आहे. बुधवारी मध्यरात्री २:४० वाजण्याच्या सुमारास सर्वजण गोठ्यात झोपले असताना, अचानक काहीतरी आवाज आल्याने मृत मुलीचे काका बाबासाहेब वारे यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता, एक भयंकर वन्यप्राणी (बिबट्या) त्यांच्या ५ वर्षांची पुतणी भाग्यश्रीला जबड्यात पकडून उचलून घेऊन जात होता.
बिबट्याला पाहून बाबासाहेब वारे आणि कुटुंबाने तात्काळ मोठमोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, बिबट्या क्षणात चिमुकलीला घेऊन गणेश सोनवणे यांच्या ऊसाच्या शेतात अदृश्य झाला. कुटुंबाने तात्काळ शेतमालक मच्छिंद्र भोसले यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी वनविभाग आणि गावातील नागरिकांना तातडीने बोलावून घेतले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. सर्व ग्रामस्थ आणि वन कर्मचाऱ्यांनी ऊसाच्या शेतात शोधमोहीम राबवून शेवटी चिमुकल्या भाग्यश्रीला शोधून बाहेर काढले.
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ५ वर्षांच्या भाग्यश्रीला तात्काळ ॲम्बुलन्समध्ये घालून न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. निष्पाप मुलीचा असा अचानक अन् दुर्दैवी अंत झाल्याने वारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पिंपळसुटी आणि परिसरातील शेतात बिबट्यांचा वावर वाढला असून, नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक आणि आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.





