
‘मुलगा फाशी घेऊन मरेल’ अशी भीती दाखवून ३.९० लाखांची फसवणूक; नाशिकच्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल
पुणे : “तुझ्या कुटुंबावर करणी झाली आहे, अघोरी पूजा केली नाही तर तुला वेड लागेल आणि तुझा मुलगा फाशी घेऊन मरेल,” अशी भयंकर भीती दाखवून एका महिलेची आणि तिच्या मुलाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना लोहगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी नाशिक येथील एका भोंदू बाबा आणि त्याच्या पत्नीविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
डिसेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत लोहगाव (पुणे), उज्जैन, नाशिक, जेजुरी आणि कोलकाता अशा विविध धार्मिक ठिकाणी ही अघोरी कृत्ये व पूजा करून आरोपींनी एकूण ३ लाख ९० हजार रुपये उकळले. याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कमलेश शिवकुमार अधिकारी, गौरी कमलेश अधिकारी (दोघे रा. गोकुळधाम, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भोंदू दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी लोहगाव येथील शिवनगरमध्ये राहणाऱ्या ५३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कमलेश अधिकारी आणि त्याची पत्नी गौरी अधिकारी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, “तुम्हाला करणीबाधा, भूतबाधा आणि तंत्रविद्याबाधा झाली आहे,” असे सांगून आरोपींनी त्यांच्या मनात तीव्र भीती आणि दहशत निर्माण केली.
भोंदू बाबाने फिर्यादींना धमकावले की, जर यावर तात्काळ अघोरी पूजा केली नाही, तर फिर्यादीला वेड लागेल आणि त्यांचा मुलगा lगळफास घेऊन आत्महत्या करेल. पोटच्या मुलाच्या जिवाचे बरे-वाईट होण्याच्या भीतीने महिला आरोपींनी सांगेल तसे करण्यास तयार झाली.
आरोपींनी करणी उतरवण्याच्या बहाण्याने फिर्यादी आणि त्यांचा मुलगा यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात पैसे उकळण्यास सुरुवात केली. ही बाधा दूर करण्यासाठी आरोपींनी फिर्यादींच्या लोहगाव येथील घरासह उज्जैन, नाशिक, जेजुरी आणि थेट कोलकाता अशा विविध शहरांमध्ये नेऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या अघोरी पूजा केल्या.
या सर्व पूजेच्या आणि विधींच्या नावाखाली आरोपींनी एकूण ३,९०,०००/- रुपये (तीन लाख नव्वद हजार रुपये) घेऊन पीडित कुटुंबाची मोठी आर्थिक आणि मानसिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी अखेर पोलिसांत धाव घेतली. एक्स याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील स्वतः करत आहेत.
#PuneCrime
#BreakingNews
#FraudAlert
#BlackMagicScam
#Maharashtra





