
दोन विधवा जावांना वाऱ्यावर सोडून जागा बळकावल्याचा आरोप
बिबवेवाडीतील साईचरण सोसायटीमधील प्रकार
लक्ष्मण मोरे
पुणे: शहरात जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे वारे वाहत असताना, या प्रक्रियेतील कायदेशीर पळवाटांचा वापर करून मूळ मालकांनाच देशोधडीला लावण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. बिबवेवाडी येथील ‘साईचरण सहकारी गृहनिर्माण संस्थे’च्या पदाधिकाऱ्यांनी दोन वृद्ध विधवा महिलांच्या मालकीची मोकळी जागा बनावट कागदपत्रे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे परस्पर सोसायटीच्या नावे करून घेतल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी सोसायटीच्या चेअरमनसह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे रिडेव्हलपमेंट क्षेत्रातील ‘बनवेगिरी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
समीर दशरथ शिंदे (चेअरमन), निखिल प्रकाश राणे (खजिनदार), अभय काकासाहेब खानविलकर (सूचक), बिपीन प्रकाश राणे (अनुमोदक), गणेश भटेवरा (सदस्य) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शैला रवींद्र कावरे (वय ६८) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शैला आणि त्यांच्या जाऊ शुभांगी सुधाकर कावरे गेल्या ३८ वर्षांपासून याच सोसायटीत राहत आहेत. या जमिनीचे मूळ मालक त्यांचे सासरे शांताराम कावरे होते. १९८७ मध्ये जेव्हा पहिल्यांदा विकास झाला, तेव्हा करारानुसार एकूण जमिनीपैकी १० टक्के जागा (११६ चौरस मीटर) कावरे कुटुंबीयांच्या मालकीची आणि ताब्यात राहिली होती.
सोसायटीला पुनर्विकासासाठी जमिनीची मालकी स्वतःच्या नावे करून घेणे आवश्यक होते. कावरे महिला तिथेच राहत असताना आणि त्यांचे वारस हक्क कायदेशीर असतानाही, सोसायटीने जिल्हा उपनिबंधकांकडे (डीडीआर) अर्ज करताना मूळ मालक मयत असल्याचे माहीत असूनही त्यांनाच ‘नोटीस’ काढण्यास सांगितले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नोटीस बजावण्यासाठी कावरे महिलांचा बिबवेवाडीतील पत्ता न देता, सदाशिव पेठेतील एक जुना आणि चुकीचा पत्ता देण्यात आला. परिणामी, सरकारी नोटीस या महिलांपर्यंत पोहोचलीच नाही. आपली बाजू मांडण्याची संधी न मिळाल्याने, उपनिबंधकांनी सोसायटीच्या बाजूने ‘एकतर्फी मानीव अभिहस्तांतरण’ प्रमाणपत्र जारी केले.
या प्रमाणपत्राच्या आधारे १३ सप्टेंबर २०२४ रोजी सोसायटीचे चेअरमन समीर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन परस्पर ‘कन्वेयन्स डीड’ नोंदवून घेतले. यामध्ये त्यांनी कावरे यांच्या मालकीची ११६ चौरस मीटर मोकळी जागा तर हडपलीच, पण दोन स्वतंत्र फ्लॅट्सचे क्षेत्रफळही चुकीच्या पद्धतीने एकत्रित दाखवून तांत्रिक फेरफार केला.
पोलिसांनी या प्रकरणाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. उपनिबंधक कार्यालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि दिलेली माहिती खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. दरम्यान, रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत असताना आपल्या जमिनीचे ७/१२ उतारा, मालमत्ता पत्रक आणि सोसायटीने उपनिबंधक कार्यालयात दिलेले अर्ज वेळोवेळी तपासावेत. कोणाचीही दिशाभूल होत असल्यास तातडीने कायदेशीर सल्ला घ्यावा.
#PuneNews #CrimeAlert #Bibvewadi #RealEstateFraud #PunePolice




