
खेड-राजगुरूनगर : जिल्ह्यातील चाकण परिसरातून जप्त करण्यात आलेल्या तब्बल १५० किलो गांजा मिश्रित ‘बंटा गोळ्या’ तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी दिलीप हुकूमतराय कुंदवाणी यांचा जामीन अर्ज खेड-राजगुरूनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या न्यायालयाने ६ जून २०२६ रोजी हा महत्त्वाचा आदेश दिला.
आरोपीच्या ताब्यातून थेट कोणतीही जप्ती झाली नसणे, तपास पूर्ण होत आलेला असणे आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे, हा बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आहे.
दिलीप हुकूमतराय कुंदवाणी असे जामिन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निखिल बाळासाहेब वरपे यांनी फिर्याद दिली आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, ९ मे २०२६ रोजी चाकण जवळील नाणेकरवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथे बेकायदेशीर अंमली पदार्थांची विक्री आणि साठा केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल निखिल वरपे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने नाणेकरवाडी येथील सह-आरोपी राहुलसिंग लोधी याच्या निवासस्थानी अचानक छापा टाकला.
घराची झडती घेतली असता पोलिसांना तिथे तब्बल १४९ किलो ७१५ ग्रॅम वजनाचा गांजा मिश्रित ‘बंटा गोळ्यांचा’ मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्याच्या कडक तरतुदींचे पालन करत हा साठा जप्त केला आणि राहुलसिंग लोधी याला अटक केली होती.
तपासादरम्यान सह-आरोपी राहुलसिंग लोधी याने हा जप्त केलेला अंमली पदार्थांचा साठा सध्याचा जामीन अर्जदार दिलीप कुंदवाणी याला विकण्यासाठी आणला होता, असा जबाब दिला. यावरून पोलिसांनी दिलीप कुंदवाणी यांनी सह-आरोपीसोबत संगनमत करून हा अंमली पदार्थांचा साठा मागवला असल्याचा आरोप ठेवून त्यांना या गुन्ह्यात अटक केली होती. यानंतर कुंदवाणी यांनी अॅड. प्रसाद विराज निकम आणि अॅड. मन्सूर तांबोळी यांच्यामार्फत न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता.
दिलीप कुंदवाणी यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करताना अॅड. प्रसाद निकम यांनी काही कायदेशीर मुद्दे न्यायालयासमोर मांडले. पोलिसांनी जप्त केलेला सर्व अंमली पदार्थ (१४९.७१५ किलो) हा पूर्णपणे सह-आरोपी राहुलसिंग लोधी याच्या घरातून आणि त्याच्या ताब्यातून मिळाला आहे. मुख्य आरोप त्याच्यावरच आहेत. अर्जदार दिलीप कुंदवाणी यांच्या प्रत्यक्ष ताब्यातून किंवा घरातून पोलिसांनी कोणतीही अंमली पदार्थांची वसुली किंवा जप्ती केलेली नाही. आरोपीची कोणतीही जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.
या प्रकरणाचा पोलीस तपास जवळपास पूर्ण झाला आहे. पोलिसांनी अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही आणि न्यायालयीन खटला तातडीने निकाली निघण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे आरोपीला तुरुंगात ठेवणे अन्यायकारक ठरेल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी बचाव पक्षाचे सर्व मुद्दे ग्राह्य धरले. एनडीपीएस सारख्या गंभीर प्रकरणातही ठोस पुराव्यांचा थेट अभाव पाहता, न्यायालयाने दिलीप कुंदवाणी यांचा जामीन अर्ज अटी व शर्तींसह मंजूर केला.
या संवेदनशील प्रकरणात आरोपीच्या बाजूने यशस्वी रित्या खटला चालवण्यासाठी मुख्य वकील अॅड. प्रसाद निकम यांना अॅड. मन्सूर तांबोळी, अॅड. शिवानी वाघमारे, अॅड. रोहित ढोते आणि अॅड. पृथ्वीजित माने यांनी कायदेशीर सहकार्य केले.
#Chakan #Rajgurunagar #BailGranted #NDPSCase #PuneNews




