
पीएमआरडीए अन् पालिकेचे बनावट परवाने जोडून २२ खरेदीखतांची नोंदणी! : बनावट सीसी व ओसी जोडून शासनाची फसवणूक
पुणे: पुण्यातील दत्तनगर, आंबेगाव येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात (हवेली क्र. २०) शासकीय यंत्रणांची बनावट कागदपत्रे सादर करून २२ खरेदीखतांची बेकायदेशीर नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीएमआरडीएची विकास परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र आणि पुणे पालिकेचे बनावट भोगवटापत्र (ओसी) वापरून ही खरेदीखते नोंदवण्यात आली. याप्रकरणी दुय्यम निबंधकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ‘साई स्वराज डेव्हलपर्स’, ‘शिवाय असोसिएट्स’, ‘श्री व्यंकटेश डेव्हलपर्स’, ‘राजलक्ष्मी डेव्हलपर्स’ यांसारख्या अनेक नामांकित डेव्हलपर्सचे भागीदार, बांधकाम व्यावसायिक आणि जागा मालक मिळून तब्बल १९ जणांवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार १४ जानेवारी २०२६, १८ फेब्रुवारी २०२६ आणि २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडला. या मोठ्या रॅकेटमुळे पुणे शहरातील रिअल इस्टेट वर्तुळात खळबळ उडाली असून, बनावट परवान्यांवर फ्लॅट खरेदी करणाऱ्या शेकडो खरेदीदारांचे भवितव्यही टांगणीला लागले आहे.
मे. साई स्वराज डेव्हलपर्स तर्फे भागीदार, सचिन अशोकराव पाटील (वय ३५, रा. नऱ्हे), महेश नामदेव कुडले (वय ३५, रा. नऱ्हे), ज्ञानोबा विजयकुमार गुरुडे (वय ३९, रा. खडकवासला), सुधीर अशोक पाटील (वय ३९, रा. नऱ्हे), मे. शिवाय असोसिएट्स तर्फे भागीदार मंगेश बाळासाहेब बेलदरे (वय ३७, रा. आंबेगाव बुद्रुक), श्री व्यंकटेश डेव्हलपर तर्फे भागीदार दत्तात्रय गोपाळ पालकर (वय ५१, रा. नऱ्हे), कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स भागीदारी संस्थेतर्फे भागीदार अनिल शंकर हाक्के (वय ४७, रा. वारजे), अशोक शाहूराव घांडगे (वय ४७, रा. धायरी), जमीन मालक/संबंधित व्यक्ती देवेंद्र शंकर अनमल (वय ६०), श्वेता/नेता देवेंद्र अनमल (वय ३०), ओंकार देवेंद्र अनमल (वय ३०), गायत्री निलेश अंकम (वय ३५), स्नेहा देवेंद्र अनमल (वय ३१, सर्व रा. नाना पेठ), श्री डेव्हलपर्स तर्फे भागीदार संतोष गणपत वाल्हेकर (वय ३६, रा. धनकवडी), विनोद खंडूजी पोकळे (वय ४६, रा. धायरी), अमिता प्रसाद कदम (वय ४८, रा. धायरी), वैयक्तिक डेव्हलपर्स व इतरपैकी देविदास राजू चव्हाण (वय ४३, रा. नऱ्हे), विक्रम भानुदास बेनकर (वय ३४, रा. धायरी), राजलक्ष्मी डेव्हलपर्स अँड बिल्डर्स तर्फे भागीदार निखिल देविदास बेलदरे (वय २७, रा. कात्रज), तुषार एकनाथ धुमाळ (वय २७, रा. किरकटवाडी), निखिल राजेंद्र काकडे (वय २५, रा. धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहदुय्यम निबंधक रवींद्र नामदेव कोळी (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींवर बीएनएस कलम ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३(५), नोंदणी अधिनियम १९०८ कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२६ रोजी ‘रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने’चे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात काही बिल्डर्सनी बनावट परवान्यांच्या आधारे दस्त नोंदणी केल्याची लेखी तक्रार पुराव्यांसह सादर केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडे दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला.
पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेच्या झोन क्र. २ कडून प्राप्त झालेल्या अहवालात संबंधित बिल्डर्सनी जोडलेले विकास परवाने, प्रारंभ प्रमाणपत्रे (Commencement Certificate) आणि भोगवटापत्रे (Occupancy Certificate) पूर्णपणे बनावट (Fake/Forged) असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित डेव्हलपर्सनी एकूण २२ खरेदीखतांमध्ये ही बनावट कागदपत्रे जोडून ती खरी असल्याचे भासवून शासनाची व निबंधक कार्यालयाची दिशाभूल केली होती.
वरिष्ठ कार्यालयाकडून कायदेशीर कारवाईचे आदेश मिळताच, सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी (जे उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार आंबेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवली. आंबेगाव पोलीस या घोटाळ्याचा पुढील तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी एका वकिलासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोळी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
#Ambegaon #PuneCrime #RealEstateScam #PMRDA #PMC #Haveli20 #ForgeryCase #PunePolice #BreakingNews #CrimeNews #MarathiNews




