
नवले पुलाजवळील ‘साई किरण’ व ‘गॅलेक्सी’ लॉजवर गुन्हे शाखेचा छापा!
९ पीडित महिलांची सुटका; लॉज मॅनेजरसह २ जणांना बेड्या
पुणे: पुण्यातील नवले पूल ते आंबेगाव परिसरात लॉजच्या नावाखाली सर्रास सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने मोठी कारवाई केली आहे. कात्रज-आंबेगाव रोडवरील ‘साई किरण लॉज’ आणि ‘गॅलेक्सी लॉज’वर अचानक छापा टाकून पोलिसांनी देहव्यवसायात ढकललेल्या ९ पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली. याप्रकरणी लॉज मॅनेजर आणि एका रिक्षाचालकाविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
रिक्षा चालक राकेश राजू पाटोळे (वय २७, रा. बेनकर चाळ, गणेशनगर, धायरी), लॉज मॅनेजर मंगेश व्यंकट बनसोडे (रा. गॅलेक्सी लॉज, आंबेगाव; मूळ रा. खेड, लोहारा, जि. धाराशिव), याच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १४३ (१), १४३ (३), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळील बर्गर किंगच्या मागे असलेल्या आंबेगाव बुद्रुक परिसरातील ‘साई किरण लॉज’ आणि ‘गॅलेक्सी लॉज’मध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त बातमी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने माहितीची शहानिशा केली. पोलिसांनी खात्री करण्यासाठी लॉजवर बनावट ग्राहक पाठवले. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलीस पथकाने दोन्ही लॉजवर अचानक छापा टाकला. या अचानक पडलेल्या छाप्यात लॉजच्या खोल्यांमध्ये वेश्यागमनासाठी ठेवलेल्या ९ पीडित महिला आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ सर्व महिलांची तिथून सुटका केली. लॉजचा वापर करून मुलींना या व्यवसायात ढकलणारा रिक्षाचालक राकेश पाटोळे आणि गॅलेक्सी लॉजचा मॅनेजर मंगेश बनसोडे या दोघांना रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या. सुटका करण्यात आलेल्या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, तसेच पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, इम्रानखान नदाफ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक आणि वैशाली इंगळे यांनी केली.




