
इन्स्टाग्रामवरून ओळख, अल्पवयीन मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात
पळून जाण्यासाठी टाकला दबाव : खराडीत पोक्सो अंतर्गत गुन्हा
पुणे : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणात ‘अयान अहमद’ याला अटक झालेली आहे. पुण्यात देखील अशाच एका ‘अयान’ने अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवरून ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर घर सोडून त्याच्यासोबत पळून जाण्यासाठी दबाव टाकला. पिडीत मुलीच्या आईने त्यांना फोनवर बोलताना पाहिले आणि हा सर्व प्रकार उघड झाला. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अयान नसीम अहमद मलिक (वय १९, रा. थिटे नगर, खराडी, मूळ रा. बिजनोर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या ३६ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्याच्या कलम ८, १२ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७८, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अयान मलिक हा उत्तर प्रदेशमधील बिजनोरमधील राहणारा आहे. तो खराडीमध्ये केशकर्तनालयात काम करतो. मागील सहा महिन्यांपासून तो पुण्यात राहण्यास आहे. तर, पिडीत मुलीचे कुटुंब सुखवस्तू आहे. आरोपी मुस्लिम तर पिडीत मुलगी हिंदू आहे.
आरोपीने इन्स्टाग्रामवरून पीडिते मुलीच्या प्रोफाईलवर जाऊन तिच्याशी मेसेजद्वारे ओळख करून घेतली. तिच्याशी सतत तो संपर्कात राहू लागला. त्यानंतर तो वारंवार तिच्या राहत्या घराजवळ येऊन तिचा पाठलाग करू लागला. याचदरम्यान आरोपीने पीडितेचा हात पकडत “माझ्यासोबत चल, नाहीतर तुला पळवून नेईन. तुझे आई-वडील काय करतात ते पाहतो,” अशी धमकी दिली. या प्रकारामुळे पीडितेच्या मनात भीती निर्माण झाली. तिच्या विनयभंगासह लैंगिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडवे करत आहेत.







