
पी. ए. इनामदार यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल : भाऊ शाहिद इनामदार यांचा धक्काबुक्कीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पुणे : पी. ए. इनामदार यांच्या कुटुंबात गोल्डन ज्युबिली एज्युकेशन संस्थेच्या मालकीवरून गृहकलह उफाळला असून इनामदार आणि त्यांचे बंधु शाहीद इनामदार यांच्या कुटुंबात हाणामारीची घटना घडली. या धक्काबुक्कीत शाहीद इनामदार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. शाहीद यांच्या कुटुंबीयांनी पी. ए. इनामदार यांच्या कुटुंबीयांनी गोल्डन ज्युबिली एज्युकेशन संस्थेच्या शाळेमधून दहा ते बारा लाखांचे साहित्य चोरून नेल्याचा आरोप देखील केला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पी. ए. इनामदार यांची मुले परवेज पिरपाशा अब्दुल रज्जाक इनामदार, इफ्तिकार पिरपाशा अब्दुल रज्जाक इनामदार, तन्वीर पिरपाशा अब्दुल रज्जाक इनामदार, पत्नी आबेदा पिरपाशा अब्दुल रज्जाक इनामदार (सर्व रा. दौलत बिल्डींग, फिशर्स क्लब जवळ, पदमजी पार्क, न्यु नाना पेठ), आरीफ फकीर मोहम्मद चौधरी, अफजल कादर खान, तसेच पाच बाऊंन्सर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुस्तफा सय्यद बाकरहुसेनी इनामदार (वय ३१, रा. १०२७, नाना पेठ, पदमजी कम्पाऊंड, खेमी निवास) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भान्यासं ३३३,१८९(१), १८९(२), १९०, ३०३(२),१३१, ७४,३५१(३), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेत सय्यद बाकरहुसेनी इनामदार ऊर्फ शाहीद इनामदार यांचा मृत्यू झाला. ही घटना ३ मे रोजी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतील कासेवाडी येथे गोल्डन ज्युबली एज्युकेशन ट्रस्टची शाळा आहे. मुस्तफा यांच्या यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आरोपींनी बेकायदेशीररित्या प्रवेश केला. त्यानंतर संस्थेतील पार्टिशन, लॅपटॉप, संगणक, बेंचेस, प्रोजेक्टर आदी शैक्षणिक साहित्य जबरदस्तीने बाहेर काढून वाहनात भरून नेण्यात आले. चोरी गेलेल्या साहित्याची किंमत सुमारे १० ते १२ लाख रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी मुस्तफा इनामदार हे आपल्या कुटुंबीयांसह घटनास्थळी पोहोचले असता आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत “ही जागा आमची आहे” असा दावा केला. या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. आरोपींनी फिर्यादींच्या वडिलांना छातीवर जोरदार धक्का देऊन खाली पाडले. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याच वेळी फिर्यादींच्या आईलाही आरोपींनी धक्काबुक्की करत तिच्या अंगाला हात लावून विनयभंग केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने फिर्यादींचे वडील अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी परवेज, इफ्तिकार, तन्वीर, आबेदा इनामदार, आरिफ चौधरी, अफजल खान तसेच त्यांच्या सोबत असलेल्या काही बाऊन्सर्स यांच्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाढे करत आहेत.
#PuneNews #BreakingNews #CrimeNews #Pune #Maharashtra





