
राजेंद्र खेर, दादा पासलकर, श्रुती पानसे, अजय कांबळे
यांना कर्तृत्वरत्न पुरस्कार जाहीर
पुणे: ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत आचार्य डॉ. माधव पोतदार यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त शब्दसारथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘कर्तृत्वरत्न पुरस्कारांची’ घोषणा करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ लेखक राजेंद्र खेर, शैक्षणिक क्षेत्रासाठी श्रुती पानसे, शाहिरी क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी शाहीर दादा पासलकर आणि पत्रकारितेतील योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार अजय कांबळे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी दिली.
पुरस्कार प्रदान सोहळा आचार्य डॉ. माधव पोतदार यांच्या स्मृतीदिनी गुरुवार दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विचार साधनाच्या सभागृहात होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. डॉ. माधव पोतदार यांनी ज्या ज्या क्षेत्रांत उत्तम काम केले त्या क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यातून त्या त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांना प्रेरणा मिळावी असा उद्देश आहे.
‘मी अल्लादियाखां’ पुस्तकाला साहित्यरत्न पुरस्कार
आपल्या साहित्यिक योगदानामध्ये तब्बल १८३ पुस्तकांचे लेखन करणाऱ्या डॉ. माधव पोतदार यांच्या नावाने या वर्षापासून एका उत्तम साहित्यकृतीचा गौरव करण्याचे पोतदार कुटुंबीयांच्या वतीने ठरवण्यात आले. त्यानुसार चरित्र-आत्मचरित्र विभागामध्ये या वर्षी अश्विनी भिडे देशपांडे यांनी लिहिलेल्या मी अल्लादियाखां या पुस्तकाला साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे. याच समारंभात हा पुरस्कारदेखील प्रदान करण्यात येणार आहे.




