
नागपूर : लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने महायुतीची राज्यात त्सुनामी आली. लाडक्या बहिणींच्या बळावर महायुती सत्तारूढ झाली. तर या मंत्रिमंडळात किती महिलांची वर्णी लागली याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. फडणवीस सरकारच्या आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात 4 महिला आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामध्ये दोन कॅबिनेट मंत्री तर दोन राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आज झालेल्या शपथविधी मध्ये भाजपकडून ३ तर अजित पवार गटाच्या वतीने एका महिलेला संधी देण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकही महिलेला मंत्रीपदाची संधी देण्यात आली नाही.
फडणवीस सरकारमध्ये ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये चार महिलांना मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर यांना तर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डिकर यांनी राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून महिलांना मंत्रीपदाची संधी देण्यात आलेली नाही.
राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव दिसून आल्याचं नेते सांगतात. राज्यातील लाडक्या बहिणींसह पक्षातील लाडक्या बहिणींना देखील आता महायुती स्थान देताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या २० महिला आमदार विजयी झाल्या आहेत. यामध्ये भाजपाच्या १४, शिवसेनेच्या २ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ४ महिला आमदारांचा समावेश आहे.
भाजपच्या निवडून आलेल्या महिला आमदार
भाजपच्या सर्वात जास्त (१४) महिला उमेदवार विजयी झाल्या आहे, १० महिला आमदार या फेरनिवडून आलेल्या आहेत. यामध्ये श्वेता महाले (चिकली मतदारसंघ), मेघना बोर्डीकर (जिंतूर), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव) आणि नमिता मुंदडा (कैज) यांचा समावेश आहे. तर श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई) आणि अनुराधा चव्हाण (फुलंब्री) या भाजपच्या चार नवीन महिला आमदार विजयी झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या महिला आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) या महिल्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित (साक्री) आणि संजना जाधव (कन्नड) या दोन महिला आमदार झाल्या आहेत. तर विरोधी पक्षात काँग्रेसच्या उमेदवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड (धारावी) या एकमेव महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.