
कात्रज व्हॅली अन् acresone.com च्या नावाने चालवला खेळ; कंपनीऐवजी खासगी खात्यांत जमा केले पैसे!
पुणे: काही वर्षांपूर्वी कात्रज येथील डोंगराची लचकेतोड केल्याप्रकरणी अटक झालेल्या किसन राठोड याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. फ्लॅट आणि मोकळे भूखंड स्वस्त दरात देण्याचे आकर्षक आमिष दाखवून नागरिकांकडून आलेली बुकींगची रक्कम हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने ‘इन्फ्राटेक’ कंपनीची अधिकृत कार्यालये थाटून ग्राहकांना विश्वासात घेत तब्बल ८७ लाख ७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी १३ आरोपींविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०२० ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत इन्फ्राटेक कंपनीचे कार्यालय आणि गृहप्रकल्प परिसर, कात्रज/धायरी याठिकाणी घडला.
किसन धावजी राठोड (रा. बीड), सुशालीनी किसन राठोड (रा. बीड), शिवकन्या राठोड (रा. कौडगाव हुडा, बीड), प्रणवी भागवत आनेराव (रा. कात्रज), चैत्राली विशाल दहिवाळ (रा. इशा ईरीका, DSK विश्वजवळ, धायरी), संजना राठोड (रा. हडपसर), अनिल शंकर देशमुख (रा. धायरी फाटा, सिंहगड रोड), हनुमंत बाळू गोरे (रा. रहाटवडे, ता. हवेली), राजेश रंगराव काकडे (रा. धनश्री पार्क, नांदेड सिटी, सिंहगड रोड), बाळासाहेब कोंडीबा घोगरे (रा. मानाजीनगर, नऱ्हे), अभिषेक चंद्रशेखर सासवडे (रा. वारजे माळवाडी), सागर गोळे, अमोल गोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(५) (विश्वासघात), ३१८(४) (फसवणूक) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसांत संगनमत करून ‘इन्फ्राटेक’ कंपनीची अधिकृत बुकींग कार्यालये स्थापन केली. त्यानंतर ‘कात्रज व्हॅली’ आणि ‘acresone.com’ अशा विविध आकर्षक नावांनी रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स सुरू केले. या प्रकल्पांमधील फ्लॅट व मोकळे भूखंड विकण्यासाठी आरोपींनी आकर्षक जाहिराती देऊन फिर्यादी व इतर ग्राहकांना आकर्षित केले. बुकींग रक्कम कायदेशीररीत्या कंपनीच्या अधिकृत बँक खात्यावर भरणे अनिवार्य असताना, आरोपींनी ती रक्कम स्वतःच्या खासगी बँक खात्यांवर ट्रान्सफर करून घेतली. फिर्यादी व इतर लोकांकडून मिळालेली लाखो रुपयांची बुकींग रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून आरोपींनी कोणालाही फ्लॅट अथवा जागा न देता ८७ लाख ७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
पैसे देऊनही वर्षांनुवर्षे जमिनीचा ताबा अथवा फ्लॅट न मिळाल्याने आणि दिलेले पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा मोठा घोटाळा समोर आला. या प्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
========
किसन राठोडचे ट्रॅक रेकॉर्ड गंभीर
२०१३ साली पावसाळ्यात कात्रज घाट आणि शिंदेवाडी परिसरात पुरास कारणीभूत ठरल्याप्रकरणी किसन राठोड याला अटक करण्यात आली होती. कात्रज घाटातील टेकडीवर अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून किसन राठोडला अटक झालेली होती. राठोड आणि त्याचा भाऊ पंडित राठोड यांच्याविरुद्ध भोरचे तत्कालीन तहसीलदार रामचंद्र चौभे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. राठोडवर डिसेंबर २०११ मध्ये खनिज चोरल्याचा राजगड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. राठोड बंधूंनी कात्रज टेकडी व बोगदा परिसरातील सर्व्हे क्रमाक ‘११२अ’ या गटात परवानगी न घेता २८०० चौरस फुटांमध्ये अनधिकृत बांधकाम केले होते. त्याचबरोबर तिथे २६९ फूट लांब आणि दहा फूट रुंद आरसीसी सिमेंटची संरक्षक भिंत बांधली होती. प्रशासनाकडून ७ फेब्रुवारी २०१३ रोजी राठोड बंधूंना नोटीस देण्यात आली होती.
#Katraj #PuneCrime #InfratechScam #KisanRathod #RealEstateFraud #BharatiVidyapeethPolice #PunePolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews




