BREAKING : येमेनच्या नागरिकांना ठेवले भाडेकरू, आठवर्षांपासून पोलिसांना माहितीच नाही; घरमालकावर गुन्हा!

कोंढव्याच्या स्कायलाईन बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये ७ ते ८ वर्षांपासून राहणाऱ्या येमेनच्या कुटुंबांची माहिती लपवली; कोंढवा पोलिसांची कारवाई
पुणे: कोंढवा परिसरात परदेशी नागरिकांना घरे भाड्याने दिल्यानंतर पोलिसांना कायदेशीर माहिती (Tenant Verification/Form C) न देता ती दडपल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. यमन (Yemen) देशाचे नागरिकत्व असलेल्या दोन कुटुंबांना मागील ७ ते ८ वर्षांपासून आपल्या फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून ठेवून पोलीस आयुक्तांच्या अधिकृत आदेशांचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी घरमालक पती-पत्नीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार कोंढवा येथील स्कायलाईन बिल्डिंगमध्ये घडला.
जब्बार अ. सत्तार खान (वय ६२), खान फैहमीदा जब्बार (वय ५५, रा. ३१८ घोरपडी पेठ, घोरपडी पेठ पोलीस चौकी समोर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. पोलीस अंमलदार चेतन दिलीप चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घरमालक खान यांनी स्वतःच्या मालकीच्या कोंढवा येथील स्कायलाईन बिल्डिंगमधील फ्लॅट क्र. ३०१ मध्ये येमेन नागरिकत्व असलेल्या एका कुटुंबातील सदस्यांना भाड्याने ठेवले होते.
यामध्ये आबिद नबील अब्दुलकरीम थाबेत (वय ५०), फतेन सलेह कुसेम अहमेद (वय ३२) यांच्यासह त्यांची पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यासोबतच यासीर नसीर अली दाऊस (वय ४०), नादा नुमन अब्दुलाह अल-साईदी (वय ३४) आणि त्यांची चार अल्पवयीन मुले असे एकूण एकूण ११ येमेनी नागरिक खान यांच्या दोन फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होते.
परदेशी नागरिकांना अथवा कोणत्याही भाडेकरूला घर भाड्याने देताना संबंधित पोलीस ठाण्यात फॉर्म भरून माहिती देणे बंधनकारक असते. मात्र, आरोपीने मागील ७ ते ८ वर्षांपासून पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, ही माहिती लपवून ठेवली आणि पोलीस आयुक्तांच्या नियमावलीचे स्पष्ट उल्लंघन केले. घरमालकाने भाडेकरू ठेवताना याबाबतची माहिती पोलिसांना बंधनकारक असते. मात्र, मागील सात ते आठ वर्षांपासून पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याठिकाणी राहणारे येमेनी नागरिक पुण्यात आणि महाराष्ट्रात सुकामेव्याचा व्यवसाय करीत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या परदेशी नागरिकांच्या माहितीबाबत हलगर्जीपणा केल्याने घरमालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस म्हणाले, की पोलीस ठाण्याकडून हद्दीमधील भाडेकरूंची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. ही तपासणी सुरु असताना संबंधित भाडेकरू हे येमेन या देशाचे रहिवासी असल्याचे समोर आले. त्यांच्या पासपोर्टची मुदत संपलेली होती. काही जण शिक्षण तर काही जण रेग्युलर व्हिसावर भारतात आलेले असल्याचे खेतमाळीस यांनी सांगितले.
==महत्वाचे मुद्दे==
आबिद नबील अब्दुलकरीम थाबेत आणि यासीर नसीर अली दाऊस हे शैक्षणिक व्हिसावर भारतात आलेले आहेत. त्यांचे वय अनुक्रमे ५० आणि ४० अशी आहेत. या वयात नेमके कोणत्या शिक्षणासाठी ते भारतात आले होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर हे शिक्षणासाठी भारतात आलेले आहेत तर मग लहान मुले आणि बायका कशा काय पुण्यात आल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक व्हिसावर भारतात आलेल्या या कुटुंबांनी पुण्यात उदरनिर्वाहासाठी व्यवसाय थाटल्याचे देखील तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
#Kondhwa #PuneCrime #KondhwaPolice #TenantVerification #YemenNationals #ForeignersInPune #PunePolice #BreakingNews #CrimeNews #MarathiNews
