
आय. व्ही. इस्टेट परिसरातील कारवाई; मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या ‘मेफेन्टरमाईन सल्फेट’ औषधाची बेकायदेशीर विक्री!
वाघोली : वाघोली परिसरात तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि जीवितास धोका निर्माण करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आय. व्ही. इस्टेट परिसरात सापळा रचून पोलिसांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मेफेन्टरमाईन सल्फेट’ या घातक औषधाच्या तब्बल १०० बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण किंवा विक्रीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात औषध विकणाऱ्या २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा छापा बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी रात्री २०:१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
सूरज पद्माकर भुत्ते (वय १८, रा. जगताप वस्ती, वाघोली, ता. हवेली; मूळ रा. उंब्रज, ता. कंधार, जि. नांदेड), आकाश गणेश धनवटे (वय १९, रा. सुखदेव कंद यांच्या भाड्याच्या घरात, १२ वा मैल, लोणीकंद, ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अप्पासाहेब शेकळे (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वाघोली येथील आय. व्ही. इस्टेट परिसरातील डीटीडीसी कुरिअर ऑफिसजवळ दोन तरुण संशयास्पद रीतीने औषधांचा साठा घेऊन उभे असल्याची गोपनीय बातमी वाघोली पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकून सूरज भुत्ते आणि आकाश धनवटे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ‘मेफेन्टरमाईन सल्फेट’ या इंजेक्शन्सच्या १०० बाटल्या आढळून आल्या. हे औषध मुख्यत्वे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली दिले जाते. मात्र, जिम करणारे तरुण किंवा नशा करणारे लोक याचा गैरवापर करतात.
तपासादरम्यान आरोपींकडे कोणताही औषध विक्री परवाना नसल्याचे आणि त्यांनी कोणतेही वैद्यकीय किंवा फार्मसीचे शिक्षण घेतले नसल्याचे उघड झाले. हे केमिकल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणालाही टोचल्यास किंवा नशेसाठी गैरवापर केल्यास त्यातील विषारी द्रव्यांमुळे मानवी आरोग्यास गंभीर इजा होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, हे माहीत असतानाही आरोपी केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि नशेसाठी त्याची बेकायदेशीर विक्री करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
#Wagholi #PuneCrime #DrugRaid #WagholiPolice #PunePolice #MephentermineSulfate #CrimeNews #BreakingNews #HealthAlert #MarathiNews




