
पुणे : पायाभूत सुविधांच्या कामांसाठी पुणे रेल्वे स्थानकावर उद्या (२ ऑगस्ट) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नऊ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल गाड्यांसह मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सात गाड्या रद्द, अशंतः रद्द, तर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
या ब्लॉक दरम्यान पुणे स्थानक परिसरातील डीडीएस पॉईंट क्रमांक २३२ आणि २२६ यांच्या जागी नवीन पॉईंट बसवण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक अभियांत्रिकी, सिग्नल आणि दूरसंचार, ओव्हरहेड इक्विपमेंट आदी कामे करण्यात येणार आहेत. या कालावधीत फलाट क्रमांक एकवरील पुणे यार्डच्या दिशेने जाणारी यूपी मेन लाईन आणि लाईन क्रमांक एक ते सहा रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध राहणार नाहीत.
दरम्यान, प्रवास सुरू करण्यापूर्वी इंडियन रेल्वेच्या चौकशी पोर्टल http://www.enquiry.indianrail.gov.in वर भेट देऊन किंवा अधिकृत एनटीईएस ॲपवरून आपल्या गाडीची अचूक सद्यस्थिती आणि अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून करण्यात आले.
पुणे-तळेगाव लोकल (गाडी क्र. ९९९०२), तळेगाव-पुणे लोकल (गाडी क्र. ९९९०३), पुणे-लोणावळा लोकल (गाडी क्र. ९९८१८), लोणावळा-शिवाजीनगर लोकल (गाडी क्र. ९९८१७), सीएसएमटी मुंबई-पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. ११००७), पुणे-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (गाडी क्र. ११००८), पुणे-दौंड डीईएमयू (गाडी क्र. ७१४०७) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जयपूर-पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. १२९४०) आणि सीएसएमटी मुंबई-पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. १२१२७) खडकी स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. नागपूर-पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. १२१३६) अमरावती-पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. ११४०६) आणि जम्मू तवी-पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. ११०७८) हडपसर स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत. लोणावळा-पुणे लोकल (गाडी क्र. ९९८१३) शिवाजीनगर स्थानकावर, तर बारामती-पुणे डीईएमयू (गाडी क्र. ७१४०६) दौंड स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाड्या दुसऱ्या स्थानकांवर सोडण्यात येणार आहेत.
पुणे-लोणावळा लोकल (गाडी क्र. ९९८२०) शिवाजीनगर स्थानकातून सोडण्यात येणार आहे. पुणे-जयपूर एक्सप्रेस (गाडी क्र. १२९३९) सायंकाळी पाच वाजून ३७ मिनिटांनी आणि पुणे-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२१२८ ) सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी खडकी स्थानकातून सोडण्यात येणार आहे. पुणे-नागपूर एक्सप्रेस (गाडी क्र. १२१३५ ) हडपसर स्थानकातून सायंकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे.





