
रागेश्री संगीत विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
पुणे : स्वर-ताल-ठेका आणि रसिकांच्या उत्स्फूर्त टाळ्या… उत्तम सादरीकरणाला मिळणारी ‘वाह’ अशी दाद… मनाला भावलेल्या गाण्यांना मिळणारा ‘वन्स मोअर’… अशी काहीशी सुंदर संध्याकाळ संगीत रसिकांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते रागेश्री संगीत विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे.

रागेश्री संगीत विद्यालयाच्यावतीने अरण्येश्वर येथील मुक्तांगण संस्थेच्या प्रेक्षागृहात २१ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायक झलक संस्थेचे संस्थापक अविनाश वैजापुरकर, चंदन भिडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संगीत विद्यालयाच्या संचालिका गायत्री गोखले, संचालक सचिन गोखले, अनिता फडके आदी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या १८ गटांनी विविध गाणी सादर केली. या गटांमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या मुलांपासून ते ८८ वर्षांच्या वयोवृद्ध नागरिकांचा समावेश होता. या कलाकारांनी अतिशय उत्साहात आणि आनंदात गाणी सादर केली. त्यांना वाद्यवृंदाने देखील समर्पक साथ देत कार्यक्रमात रंग भरला. यावेळी पेटीवर गायत्री गोखले, चंड विशेष वाद्य सचिन गोखले आणि तबल्यावर अभिजीत पानवलकर, किबोर्डवर सतीश कुलकर्णी, हेमंत पोटफोडे होते. ध्वनी व्यवस्था दीपक कुलकर्णी यांनी केली.

यावेळी सचिन गोखले यांनी शंख वादन करून रसिकांची मने जिंकली. तर, भाग्यदा आणि गायत्री गोखले यांच्या गीताने बहार आणली. प्रमुख अतिथी अविनाश वैजापुरकर यांनी गायत्री यांच्यासह सुधीर फडके यांचे ‘धुंदी कळ्यांना’ हे गीत सादर केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका मंजूषा खेडकर, श्वेता मोरे आणि अपर्णा देशपांडे यांनी केले. तर, आभार भाग्यदा गोखले हिने मानले.

#PuneCulture #MusicConcert #RageshreeSangeetVidyalaya #PuneNews #LiveMusic #ClassicalMusic #MarathiSongs #PuneEvents #CulturalPune #MarathiNews




