
Screenshot
अपघात नव्हे तर ‘खून’! वाग्दत्त वधू आणि प्रियकराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे: लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान पाय घसरून दरीत पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे मानले गेलेल्या २६ वर्षीय व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल प्रकरणाला मंगळवारी धक्कादायक वळण मिळाले. केतनचा मृत्यू हा अपघात नसून, त्याचीच होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने रचलेला एक भयानक खुनाचा कट होता, असा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी केतनच्या वाग्दत्त वधूसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा तपास कसोशिने सुरू करण्यात आला आहे.

सिया प्रवीण गोयल (वय २०, रा. लीलाकुंज, ७८/२१, न्यू एरा सोसायटी समोर, गंगाधाम चौक, मार्केट यार्ड), चेतन बाबूलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, बी ४/३०१, कोंढवा बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत. केतन विशाल अग्रवाल (वय २५, रा. लोढा बेलमोंढे, गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. केतन हा त्याच्या कुटुंबाच्या ‘शुभ डेव्हलपर्स’ या रिअल इस्टेट कंपनीत डायरेक्टर होता.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. केतन आणि सिया यांचे लग्न ठरले होते. येत्या नोव्हेंबर २०२६ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकणार होते. दोन्ही कुटुंबांनी या भव्य शाही लग्नासाठी राजस्थानमधील उदयपूर येथे एक आलिशान महाल देखील बुक केला होता. केतन सियासह तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. १८ जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्याच्या एका कड्यावर फोटो काढत असताना, जोराच्या वाऱ्यामुळे केतनचा तोल गेला आणि तो ४०० फूट खोल दरीत कोसळला, अशी माहिती सुरुवातीला सियाने पोलिसांना दिली होती. लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूच्या झुडपांमध्ये केतनचा मृतदेह आढळला होता. सिया हिने कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार केतनचा भाऊ हर्ष अग्रवाल याने पोलिसांकडे तक्रार दिली. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.

मात्र, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि केतनच्या कुटुंबीयांचा संशय बळावला होता. पोलिसांनी घातपाताची शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान केतनची होणारी पत्नी सियाचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. केतन हा या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने दोघांनी कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मंगळवारी पोलिसांनी याप्रकरणी सिया व तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान घातपाताची खात्री झाल्यानंतर या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, केतनचे वडील विशाल देवीचंद अग्रवाल (वय ४६) यांनीही सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर संशय व्यक्त करत फिर्याद दिली.
केतनचा खून केल्यानंतर ती पोलिसांच्या आणि समाजाच्या नजरेत निष्पाप राहावी, यासाठी सिया गोयल हिने सोशल मीडियावर एक मोठी भावनिक पोस्ट लिहिली होती. तिने स्वतःच्या वाढदिवशी केतनसोबतचे फोटो, जुने चॅट्स आणि व्हिडिओ एकत्र करून एक अत्यंत भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामाध्ये तिने “तू माझ्या वाढदिवशीच मला सोडून गेलास… आपण लग्नाच्या इतके जवळ आलेलो असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्ने होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? रेस्ट इन पीस” असा मजकूर तिने लिहिला होता. सुरुवातीला या पोस्टमुळे अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र, आता ती पोलिसांच्या ताब्यात जाताच तिची हीच जुनी पोस्ट सोशल मीडियावर तीव्र संतापासह पुन्हा व्हायरल झाली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या हत्येला अपघाताचे रूप दिले होते. परंतु, पोलिसांनी संशयितांचे मोबाईल डेटा, कॉल डिटेल्स रेकॉर्ड, डिलीट केलेले चॅट्स आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी या डिजिटल पुराव्यांची तपासणी केली असता, सिया आणि तिच्या प्रियकरामध्ये केतनला संपवण्याबाबत झालेला संवाद समोर आला. सध्या दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, हा कट नेमका कधी रचला गेला? आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शुभम कुमार, लोणावळा उपविभागाचे डीवायएसपी गजानन टोणपे, आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीणचे निरीक्षक दिनेश तायडे, एलसीबीचे उपनिरीक्षक अभिजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस अंमलदार संतोष शेळके, तुषार भोईटे, गणेश होळकर, संजय पडयाळ, अजित भुजबळ, अमोल शेडगे, भारत मोहोळ, चेतन पाटील, गणेश धनवे, संतोष भापकर, वैभव सावंत, अजय देडे, भाऊसाहेब पुंड, समीर तांगडे यांचा समावेश होता. तसेच महिला अंमलदार नंदा कदम, सुजाता कदम, शरयू बिरंबुळे आणि लोणावळा ग्रामीणचे अंमलदार जय पवार, सागर धनवे, अमोल कसबेकर, संजय पंडित, प्रशांत तुरे, पवन कराड व सचिन गायकवाड यांनी ही कारवाई केली.

==असा रचला कट==
चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, सियाचे लग्न घरच्यांनी केतन अग्रवालसोबत ठरवले होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, तसेच केतन हा त्यांच्या प्रेमसंबंधात आडकाठी आणत होता. दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचला. योजनेनुसार सियाने केतनला फिरण्याच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर नेले. सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याला गुपचूप पाठीमागून किल्ल्यावर बोलावून घेतले. किल्ला फिरत असताना एका निर्मनुष्य आणि खोल दरीच्या कड्यावर संधी साधून दोघांनी केतनला मागून जोरात ढकलून दिले. केतन ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
#PuneCrime #LohagadFort #KetanAgrawal #MurderCase #PunePolice #CrimeNews #Lonavala #BreakingNews #TrendingNews #SocialMediaViral #MarathiNews




