
डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुण्यात लोकार्पण
पुणे: “वृद्धत्व ही आपल्या अनुभवाची सुमधुर फळे देणारा एक वृक्ष असतो. परंतु, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणावर एकटेपण येत आहे. अशा काळात त्यांना एका खऱ्या आणि विश्वासू साथीदाराची आवश्यकता असते. ‘आएस्का’ ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठांना हा हक्काचा डिजिटल साथीदार व मदतनीस लाभणार आहे,” असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला.
‘ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन’ (एआयएससीए) संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी खास विकसित करण्यात आलेल्या ‘आएस्का‘ (AISCA) मोबाईल ॲपचे नुकतेच पुण्यात दिमाखात लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ‘आयएमए’ (IMA) चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, अरविंद बुधाणी, ‘आपलं घर’ या संस्थेचे विजय फळणीकर, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, असोसिएशनच्या संस्थापक व संचालिका शकीला शेख आदी उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यात संस्थेच्या संचालिका शकीला शेख यांनी ॲपच्या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर माहिती दिली. हे ॲप ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार असून, यामध्ये महत्त्वाच्या सुविधा एकाच ठिकाणी देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष गरजेच्या किंवा संकटाच्या क्षणी केवळ एका क्लिकवर ज्येष्ठांना तात्काळ मदत मिळण्याची सुविधा, ज्येष्ठांना सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी आणि डिजिटल तंत्रज्ञान सहज वापरता यावे यासाठी विशेष मार्गदर्शन, आरोग्याची काळजी घेण्या संदर्भातील टिप्स आणि वैद्यकीय संपर्क व्यवस्था, इतर ज्येष्ठांशी संवाद साधून एकटेपणा दूर करण्यासाठी संपर्क व्यासपीठ यांचा यामध्ये समावेश आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. रवींद्र शाळू आणि सुनीला कवीटकर यांनी ‘ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन’ संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. किशोर सरपोतदार यांनी मानले.
#SeniorCitizens #AISCAApp #PuneNews #GirishPrabhune #ElderlyCare #DigitalIndia #TechForGood #SeniorSafety #PuneEvents #MarathiNews





