
ई-चलन मशीन तोडले, व्हिडिओ काढणाऱ्या पोलिसाचा मोबाईल फेकला
सिंहगड रोडवरील प्लंबर गजाआड
पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गाड्यांच्या कागदपत्रांची आणि परवान्याची मागणी करणाऱ्या भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या पोलीस अंमलदारांना एका उद्दाम दुचाकीस्वाराने रस्त्यावरच बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. आरोपीने ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या डोक्यात हेल्मेटने प्रहार केला, सरकारी ई-चलन मशीन फेकून नुकसान केले आणि पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ही घटना गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सायंकाळी १८:३० वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील नवीन पीएमटी बस स्टॉपजवळ घडली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.
सदानंद कोंडीबा साळुंके (वय ४५, दत्तप्रसाद कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संतोष बापू खाडे (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२१(१), ३२४(३), ३५२ आणि २८१ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी कात्रज बायपास परिसरात वाहतूक नियमन करत होते. यावेळी आरोपी सदानंद साळुंके हा आपली दुचाकी (एमएच १२ डीक्यु २६५९) वाहतूक नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अत्यंत बेदरकारपणे चालवताना आढळला. त्यामुळे तिथे कर्तव्यावर असलेले साक्षीदार पोलीस अंमलदार पाटणे यांनी त्याला बाजूला घेऊन ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली.
याचा राग आल्याने आरोपी साळुंके पोलिसांशी उद्धटपणे बोलू लागला. वाद वाढत असल्याचे पाहून फिर्यादी पोलीस अंमलदार खाडे तिथे गेले आणि त्यांनी कागदपत्रे मागितली, मात्र आरोपीने ती दाखवण्यास साफ नकार दिला. त्यामुळे खाडे यांनी दंडात्मक कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडील अधिकृत सरकारी ई-चलन मशीनद्वारे संबंधित दुचाकीचा आणि चालकाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
फोटो काढत असल्याचे पाहताच आरोपी साळुंकेचा पारा चढला. त्याने उजव्या हाताने जोरात पोलीस अंमलदार खाडे यांच्या डोक्यात मारले. हा फटका इतका जोरात होता की खाडे यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ते खाली बसले. तितक्यात आरोपीने खाडे यांच्या हातातील सरकारी ई-चलन मशीनवर जोरात मारल्याने मशीन रस्त्यावर खाली पडले आणि त्याचे नुकसान झाले.
खाडे हे मशीन उचलण्यासाठी खाली वाकले असता, आरोपीने थेट त्यांची वर्दीची कॉलर पकडली आणि स्वतः जवळील हेल्मेटने त्यांच्या डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. खाडे यांचे सहकारी अंमलदार पाटणे यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने सर्व पोलिसांना उद्देशून शिवीगाळ व दमदाटी केली. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असलेले दुसरे सहकारी पोलीस अंमलदार पाटील हे आपल्या कंपनीच्या मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण करत होते. आरोपीने त्यांचाही मोबाईल हिसकावून रस्त्यावर फेकून दिला आणि फोनचे नुकसान केले. अखेर इतर पोलिसांनी आरोपीला जागीच पकडून ताब्यात घेतले. वाहतूक पोलिसांवर ऑन-ड्यूटी हल्ला झाल्याची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सजगणे यांनी तात्काळ पोलीस ताफ्याससह घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेत पुढील कारवाई करण्यात आली.
#PuneCrime #PunePolice #TrafficPolice #Katraj #CrimeNews #PuneNews #BreakingNews #LawAndOrder #MarathiNews #PoliceAttacked



