
झारखंड उच्च न्यायालयाने धोनीला धाडली नोटीस : न्यायालयात हजर होण्याचे दिले आदेश
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सध्या 2025 च्या आयपीएलमध्ये खेळण्याची तयारी करीत आहे. झारखंड उच्च न्यायालयाने धोनीला व्यावसायिक कराराच्या बाबतीत नोटीस धाडली आहे. धोनीचे एकेकाळचे भागीदार मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी हा खटला दाखल केला आहे. उच्च न्यायालयाने धोनीला या प्रकरणात कोर्टात हजर होऊन आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
दिवाकर आणि दास ‘अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेड’चे संचालक आहेत. त्यांनी धोनीसोबत त्याचे नाव वापरून क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा करार केला होता. धोनीने दोघांवर धोका दिल्याचा आरोप करत ५ जानेवारी रोजी त्यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली होती. धोनीचे म्हणणे होते की, 2021 मध्ये त्यांनी हा करार रद्द केला होता. तरीही दोघांनी धोनीचे नाव वापरले. धोनीने आपली १५ कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा आरोप केला होता.
रांची येथील न्यायालयाने धोनीने या दोघांवर केलेल्या तक्रारीची दखल घेतली होती. त्यानंतर धोनीविरोधात दिवाकर आणि दास यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच प्रकरणात धोनीला न्यायालयात उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.