
वाकडमधील महिलेला परदेशातून धमकीचा कॉल
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील एका उच्चभ्रू आणि आलिशान ‘पार्क स्ट्रीट’ सोसायटीत राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या कथित ‘अर्जुन बिश्नोई’ गँगच्या नावाने ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. “पाच कोटी रुपये द्या, अन्यथा तुझ्या कुटुंबासह सर्वांना संपवून टाकेन,” अशी थेट धमकी परदेशातील अज्ञात मोबाईल क्रमांकावरून देण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या पीडित महिलेचे पती सध्या कामानिमित्त दुबई येथे असून, त्यांनाही तिथे अशाच प्रकारे ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचे फोन आले आहेत. या आंतरराष्ट्रीय धमकी सत्रामुळे वाकड परिसरात प्रचंड घबराट पसरली असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू केला आहे.
वाकड येथील ‘पार्क स्ट्रीट’ या अत्यंत उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पात पीडित ३४ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह राहते. तिचे पती व्यावसायिक कारणास्तव सध्या दुबई येथे वास्तव्यास आहेत. आरोपींनी सुनियोजित कट रचून या कुटुंबाची संपूर्ण माहिती काढली असून, एकाच वेळी पुणे आणि दुबईत फोन करून ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवडमधीलच रावेत भागात एका नामांकित व्यापाऱ्याला अशाच प्रकारे बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन आला होता. त्या व्यापाऱ्याने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर, दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी थेट त्याच्या दुकानावर भरदिवसा गोळीबार केला होता. याशिवाय पुणे शहरातही एका व्यापाऱ्याच्या दुकानावर बिश्नोई गँगच्या नावाने कॉल आल्यानंतर गोळीबार करण्यात आला होता. रावेत गोळीबारातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली असली, तरी आता थेट वाकडमध्ये महिलेला टार्गेट केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
परदेशातील नंबरवरून (इंटरनॅशनल व्हर्च्युअल नंबर्स) हे फोन कॉल आले असल्याने तांत्रिक तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेल आणि जबरदस्तीने खंडणी वसूल विरोधी पथकाची मदत घेतली जात आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पीडित महिलेच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. हा कॉल खरोखरच बिश्नोई गँगच्या हस्तकाने केला आहे, की आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून स्थानिक गुन्हेगारांनी किंवा पाकिस्तानातील आयपी अॅड्रेसवरून कोणीतरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने रचलेला हा कट आहे, याचा सखोल तपास वाकड पोलीस करत आहेत.



