
पुणे : पुण्यातील बांधकाम व्यवसायात मोठी गुंतवणूक करून आकर्षक परतावा आणि फ्लॅट्स देण्याचे आमिष दाखवून एका ५७ वर्षीय व्यावसायिकाची आणि त्यांच्या वृद्ध आईची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार २५२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी कायदेशीर कराराचा भंग करत गुंतवणूकदारांना फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात ड्रिम्स कॉर्पोरेशनच्या संचालकांसह चार भागीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फसवणुकीचा प्रकार सप्टेंबर २००९ आणि मार्च २०१७ पासून आजतागायत सुरू होता.
रमेश घिसुलाल मेहता (संचालक – ड्रिम्स कॉर्पोरेशन), उमेश शशिकांत अंबर्डेकर (रा. फ्लॅट नंबर ५, शंकर महाराज सोसायटी, बिबवेवाडी), हंसमुख प्रकाश बांटीया (रा. पंचशील हौसिंग सोसायटी, रहेजा टाऊनशिप, मलाड ईस्ट, मुंबई), हितेश सुभाष लोढा (रा. सदा सोबा, चंद्रविजय हौसिंग सोसायटी, महर्षीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश शेषमल कोठारी (वय ५७, रा. सिल्व्हन रिट्रीट अपार्टमेंट, रेंज हिल रोड, अशोकनगर, शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार गणेशखिंड येथील विद्यापीठ रस्त्यावरील सिटी मॉलमध्ये असलेल्या ड्रिम्स कॉर्पोरेशनमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश कोठारी आणि त्यांची आई प्रेमा कोठारी यांनी आरोपी रमेश मेहता व त्याच्या इतर भागीदारांच्या वेगवेगळ्या रिअल इस्टेट आणि बांधकाम प्रोजेक्ट्समध्ये वेळोवेळी मोठी गुंतवणूक केली होती. ही रक्कम फिर्यादींनी आरोपी रमेश मेहता याच्या जंगली महाराज रस्ता येथील ॲक्सिस बँक शाखेतील वैयक्तिक बँक खात्यात वेगवेगळ्या चेक आणि ट्रान्सफरद्वारे जमा केली होती.
गुंतवणूक करून घेतल्यानंतर आरोपींनी कोठारी कुटुंबीयांना मोठा परतावा देण्याचे कबूल केले होते. जेव्हा आरोपींना परतावा देणे शक्य झाले नाही, तेव्हा त्यांनी कोठारी कुटुंबीयांसोबत ‘नोटराईज एमओयू’ केला. या कराराद्वारे आरोपींनी त्यांच्या वेगवेगळ्या चालू बांधकाम प्रकल्पांमध्ये घेतलेल्या गुंतवणुकीच्या मूल्याएवढेच वेगवेगळे फ्लॅट्स देण्याचे कायदेशीररीत्या कबूल केले होते.
कराराची मुदत संपल्यानंतरही आरोपी ड्रिम्स कॉर्पोरेशनच्या संचालकांनी फिर्यादी राजेश कोठारी आणि त्यांच्या आईला प्रत्यक्षात कोणत्याही बांधकाम प्रोजेक्टमध्ये फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करूनही कोठारी यांनी गुंतवलेले मूळ ८ कोटी ८१ लाख ९२ हजार २५२ रुपये आणि त्यावरील ठरलेला परतावाही परत केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोठारी यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात धाव घेऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे दाद मागितली. प्राथमिक चौकशीनंतर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला.
गुन्ह्यातील रक्कमेचा आकडा हा तब्बल ८.८१ कोटी रुपयांच्या वर असल्याने आणि ड्रीम्स कॉर्पोरेशनशी संबंधित मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे संकेत असल्याने, या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे करत आहेत. आरोपींच्या बँक खात्यांचे स्टेटमेंट्स गोठवणे आणि ड्रीम्स कॉर्पोरेशनने यापूर्वी अशा प्रकारे इतर किती गुंतवणूकदारांना बांधकाम प्रकल्पाच्या नावाखाली गंडा घातला आहे का, यादृष्टीने पोलीस कसून तपास करत आहेत.
#PuneCrime #DreamsCorporation #RealEstateFraud #PunePolice #EconomicOffencesWing #Chaturshungi #PropertyScam #CrimeNews #MarathiNews #PuneNews




