
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमधून सिम काढून बँक खाती केली रिकामी
पुणे : ऑनलाईन गेम खेळण्याच्या व्यसनापायी आणि पैशांच्या हव्यासापोटी एका २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने रेल्वे प्रवाशांना लुटण्याचा नवा आणि धोकादायक फंडा शोधून काढला. रेल्वे स्टेशनच्या स्लीपर वेटिंग रूममध्ये प्रवाशांनी चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमधून सिमकार्ड चोरायचे आणि त्या सिमकार्डच्या आधारे पीडित व्यक्तीचे गुगल फोटोज हॅक करून बँक खात्यांवर डल्ला मारायचा, असा या सुशिक्षित चोरट्याचा कारनामा होता. याप्रकरणी पुणे लोहमार्ग (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने संयुक्त सापळा रचून आकुर्डी येथील संबंधित आरोपीला अटक केली आहे.
संकेत सतीश कुलकर्णी (वय २३, रा. सरोवर हौसिंग सोसायटी, जिजामाता चौक, आकुर्डी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विनोद सदाशिव रेणके (वय ४७, रा. शिव मातोश्री चव्हाण कॉलनी, अजिंक्य नगर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद रेणके हे २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवरील स्लीपर वेटिंग रूममध्ये बसले होते. त्यांनी आपला मोबाईल फोन तिथेच चार्जिंगला लावला होता. थोड्या वेळाने त्यांनी मोबाईल पाहिला असता, मोबाईल चालू होता मात्र त्यातील सिमकार्ड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
रेणके यांनी तात्काळ सांगलीला जाऊन किंवा जवळच्या केंद्रातून त्याच नंबरचे दुसरे सिमकार्ड विकत घेतले आणि मोबाईलमध्ये टाकले. सिम चालू होताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या मोबाईलवर बँक आणि ई-कॉमर्स कंपन्यांचे मेसेज आले होते. आरोपीने त्यांच्या सिमकार्डचा वापर करून त्यांच्या नावे परस्पर ऑनलाईन कर्ज मंजूर करून घेतले होते आणि ‘फ्लिपकार्ट‘वरून तब्बल १ लाख १३ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन खरेदी केले होते. तसेच बँक खात्यातून ४,५०० रुपयांचे इतर ट्रान्झॅक्शन झाले होते. एकूण १ लाख १७ हजार ५०० रुपयांना चोराने गंडा घातल्याचे स्पष्ट होताच रेणके यांनी पुणे लोहमार्ग पोलिसांत धाव घेतली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र ज्या वेटिंग रूममध्ये पहिली चोरी झाली, तिथले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक कारणास्तव बंद असल्याने संशयिताचा कोणताही सुगावा लागला नाही. तांत्रिक तपास करताना आरोपी सतत सिमकार्ड बदलत असल्याने पोलिसांना अडचणी येत होत्या. दरम्यान, २९ मे २०२६ रोजी पुन्हा तशाच पद्धतीने स्लीपर वेटिंग रूम नंबर २ मध्ये सिमकार्ड चोरीची दुसरी घटना घडली. पोलिसांनी तात्काळ वेटिंग रूम, प्लॅटफॉर्म आणि स्टेशन परिसरातील इतर सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका संशयास्पद तरुणाचा फोटो पोलिसांच्या हाती लागला. आरोपी अशा चोऱ्या करण्यासाठी अधूनमधून स्टेशनवर येत असल्याचा अंदाज पोलिसांना आला.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सलग ११ दिवस त्या संशयित चेहऱ्याचा सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांद्वारे माग काढला. अखेर ९ जून २०२६ रोजी तो तरुण पुन्हा रेल्वे स्टेशनवर आल्याचे दिसताच लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आकुर्डीच्या संकेत कुलकर्णी याला ताब्यात घेतले. पोलिसी कौशल्याने कसून चौकशी केली असता आरोपी संकेत कुलकर्णी याने गुन्ह्याची कबुली दिली. उच्चशिक्षित असूनही चोरी करण्याच्या कारणाबाबत विचारले असता त्याने सांगितले की, त्याला ऑनलाईन गेम खेळण्याचे प्रचंड व्यसन आहे आणि त्यासाठी त्याला पैसे कमी पडत होते. त्यामुळेच त्याने हा प्रकार केला. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू जप्त केल्या असून, त्याने अशाच प्रकारचे सुमारे ३ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, उपनिरीक्षक शंभू रणवरे, उपनिरीक्षक साळुंखे यांच्या पथकाने केली.
आरोपी संकेत याचे मूळ गाव धारशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात करंजगाव हे आहे. त्याचे भोर येथील धांगवडी येथे असलेल्या राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पसमध्ये सिविल इंजिनियर म्हणून शिक्षण झाले आहे. तो सध्या जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या एका संस्थेत व्हीएफएक्सचे शिक्षण घेतोय. त्याचे सतीश कुलकर्णी शेतकरी असून गावाकडे शेती करतात. त्याला ऑनलाइन गेमिंग खेळण्याचा नाद असल्याने त्याने गावाकडील एक ते दीड लाख रुपये घरी न सांगता घेऊन ते ऑनलाईन गेमिंग साठी खर्च केले. सध्या पुणे येथे राहत असल्यामुळे इतर खर्च व ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैशाची गरज त्याला भासत होती. त्यामुळे त्याने सिम कार्ड चोरी करणे व त्याच्या माध्यमातून लोकांच्या खात्यामधील पैसे काढणे इत्यादी प्रकार सुरू केले. लोहमार्ग पोलीस ठाणे येथे याबाबत तीन तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. आरोपीने तीनही गुन्हे केल्याचे कबूल केल्याने तीनही गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपीची ‘मोडस ऑपरेंडी’
१. रेल्वे स्टेशनवर चार्जिंगला लावलेल्या फोनमधून हळूच सिमकार्ड चोरायचे.
२. ते सिमकार्ड स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकून पीडित व्यक्तीचे ‘जीमेल’ अकाउंट चालू करायचे.
३. त्या जीमेल आयडीवरून ‘गुगल फोटोज’ ओपन करायचे.
४. नागरिक अनेकदा आपल्या सुरक्षिततेसाठी बँकेचे कार्ड किंवा ओळखपत्राचे फोटो मोबाईलमध्ये सेव्ह ठेवतात. आरोपी गुगल फोटोजमधून संबंधित प्रवाशाचे डेबिट कार्ड किंवा कागदपत्रांचे फोटो मिळवायचा.
५. त्या माहितीच्या आधारे ‘फोन पे’ किंवा ‘पेटीएम’चा यूपीआय पिन रीसेट करून बँक खात्यातून पैसे काढायचा, ऑनलाईन लोन घ्यायचा आणि महागड्या वस्तू खरेदी करायचा.
#PuneCrime #CyberCrime #SimCardTheft #PunePolice #GooglePhotosHack #RailwayPolice #GRP #OnlineGaming #CrimeNews #MarathiNews #Alert




