
मानसिक छळ, ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या : फुरसुंगीमधील घटनेने उडाली खळबळ
पुणे : राज्यभरात तरुणी आणि महिलांविषयी घडत असलेल्या कथित ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच पुण्यामधून एका तरूणासोबत घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला जाळ्यात ओढून त्याचे नात्यातील मुलीशी लग्न लावून देत त्यानंतर त्याला आपले ‘शेख’ आडनाव लावण्यासाठी सतत दबाव टाकण्यात आला. त्याला मानसिक त्रास देण्यात आला. या त्रासाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केली. हा प्रकार फुरसुंगी येथील भेकराई नगर येथे घडला. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण रमेश वाघमारे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रेश्मा शेख, सोएब शेख (दोघेही रा. दांडेकर पूल) अशी गुन्हा दाखल झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत. याप्रकरणी प्रमोद रमेश वाघमारे (रा. त्रिमुर्ती चौक, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. वाघमारे कुटुंब मूळचे जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील राहणारे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण २०१३ मध्ये कामानिमित्त पुण्यात आला होता. तो पुण्यात केटरर्स मॅनेजर म्हणून काम करीत होता. तो सुरुवातीला कात्रज येथे रहात होता. त्याची आई आणि फिर्यादी २०१७ मध्ये फुरसुंगी येथे राहायला आले. दरम्यान, प्रवीणचा मागील पाच ते सहा वर्षांपासून रेश्मा शेख हिच्याशी संपर्क होता. तिने व तिचा भाऊ सोएब यांनी साथीदारांच्या मदतीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्याच्याकडून पैसे उकळले व ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रेश्मा शेख हीने पूर्वनियोजित कट रचून प्रवीणचे लग्न त्यांच्या ओळखीतील तेजल सिंग हिच्यासोबत ९ डिसेंबर २०२५ रोजी जेजुरी येथे लावून दिले. मात्र, वधूची सविस्तर माहिती कुटुंबाला देण्यात आली नव्हती, असे फिर्यादीत नमूद आहे. लग्नानंतर त्याला तेजलची आत्या फरीदा शेख ही सतत मानसीक त्रास देत होती. तसेच, रेश्मा देखील त्याला माझे ‘शेख’ आडनाव लाव असा दबाव टाकत होती. या सर्व प्रकारामुळे प्रविण अत्यंत मानसिक तणावाखाली होता. ६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी प्रवीणने कुटुंबीयांना या त्रासाबाबत सांगितले होते. सोएब शेख व रेश्मा शेख यांनी लग्न झाल्यापासून सतत आमचे ‘शेख’ आडनाव लाव असे म्हणत सतत मानसिक त्रास दिल्याचे सांगितले. आई व भावाने त्याची समजूत काढली. त्यानंतर, फिर्यादी त्यांची रिक्षा घेऊन भेकराई डेपो येथे गेले. तसेच, त्यांची आई साहित्य आणण्यासाठी घराबाहेर गेली. त्यावेळी घरामध्ये प्रविण व त्याची बायको तेजल सिंग होते.
साधारण पावणेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांची आई इमारतीच्या खाली असताना तेजल सिंग त्यांना भेटली. ती माहेरी जात असल्याचे सांगून निघून गेली. त्यानंतर, हे दोघेही घरी गेले. यावेळी, हॉलचा दरवाजा उघडा दिसला. बेडरुममध्ये जाण्यासाठी दरवाजा ढकलला असता तो उघडला नाही. त्यांनी प्रविणला आवाज दिला. परंतु, त्याने दरवाजा उघडला नाही. फिर्यादीने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा, प्रवीणने नायलॉन दोरीने सिलींग फॅनला गळफास घेतल्याचे दिसले.
कुटुंबीयांनी त्याला तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढे कमांड हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून प्रवीणने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




