
आधारकार्ड अनिवार्य, २६ जानेवारीपासून समान नागरी संहितेचे नवे नियम लागू
#नवी दिल्ली
उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी संहितेचे (यूसीसी) नवीन नियम लागू केले जाणार आहेत. या अंतर्गत आता राज्यात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना विवाहाप्रमाणे नोंदणी करावी लागेल. यासह सर्व प्रकारच्या शासकीय नोंदण्या करताना व्हीडीओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे. जसे की मृत्युपत्र बनवणे, आधारकार्ड बनवणे, लग्नाची नोंद करणे यामध्ये साक्षीदारांचेही व्हीडीओ रेकॉर्ड करणे अनिवार्य असेल. उत्तराखंडमधील सर्व रहिवाशांना हे नियम लागू होतील.
२६ जानेवारीपासून राज्यात हे नवीन नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने तशी तयारीदेखील सुरू केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने त्यांच्या अधिकाऱ्यांना यूसीसी पोर्टलची माहिती घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. देहराडूनमधील डोईवाला ब्लॉक कार्यालयात यासंबंधीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
यूसीसीच्या नव्या नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भात तीन उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देहराडूनमध्ये महत्त्वाची बैठक व प्रशिक्षण शिबिर पार पडले. २० जानेवारीपर्यंत हे प्रशिक्षण शिबिर चालू असेल. या शिबिरात अधिकाऱ्यांना यूसीसी पोर्टलबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यूसीसी पोर्टल तीन प्रकारे चालवले जाणार आहे. नागरिकांव्यतिरिक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी यामध्ये स्वतंत्र पर्याय असतील. या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य असेल. या पोर्टलवर विवाह, घटस्फोट, लिव्ह इन नोंदणी, लिव्ह-इन रिलेशनशिप संपुष्टात आणणे, उत्तराधिकारी व कायदेशीर वारस घोषित करणे, मृत्यिपत्राची नोंद केली जाईल.
पोर्टलच्या माध्यमातून करता येणार तक्रार
लग्न किंवा लिव्ह-इनबाबत कोणाची काही तक्रार असेल तर तीसुद्धा याच पोर्टलच्या माध्यमातून करता येईल. या पोर्टलवर कोणीही चुकीची माहिती अपलोड करू नये, कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी सब-रजिस्ट्रारला तक्रारींची पडताळणी करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. दरम्यान, या पोर्टलचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक मुकेश म्हणाले की, तक्रार करणाऱ्या नागरिकालाही पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. तसेच खोट्या तक्रारींवर लक्ष ठेवण्याचे कामही सब-रजिस्ट्रारला सोपवण्यात आले आहे. सध्या राज्यात लिव्ह-इनमध्ये राहात असलेली जोडपी व आगामी काळात लिव्ह-इनमध्ये राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना पोर्टलवर त्यांचे नाव, वय, राष्ट्रीयत्व, धर्म, पूर्वीच्या नातेसंबंधांची स्थिती व फोन नंबर द्यावा लागेल. विवाह नोंदणीसाठीदेखील हीच माहिती पोर्टलवर प्रविष्ट करावी लागेल.