
नुकताच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ प्रदर्शित झाला आहे. अजय देवगण पुन्हा एकदा ‘बाजीराव सिंघम’च्या रूपात प्रेक्षकांसमोर आला आहे. या सिनेमात पुन्हा एकदा तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली. याच सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेता अजय देवगण याने अक्षय कुमारबाबत एक वक्तव्य केले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘सिंघम अगेन’ दिवाळीच्या निमित्ताने सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ सोबत टक्कर सुरू आहे. तत्पूर्वी अजय देवगनने सोशल मीडियावर ‘सिंघम अगेन’चा सह-अभिनेता अक्षय कुमारवर मजेदार अंदाजात टीका केली. चित्रपटात रणवीर सिंग ‘सिंबा’ आणि अक्षय कुमार ‘सूर्यवंशी’ म्हणून पुन्हा पडद्यावर झळकले आहेत. दीपिका पादुकोण पहिल्यांदाच ‘शक्ति शेट्टी’ या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर समोर आला तेव्हाच फॅन्सची उत्सुकता शिगेला पोचली होती. ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्यामुळे तिसऱ्या भागाकडूनही फॅन्सच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
अजय देवगनला फॅनने विचारला हा प्रश्न :
‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अजय देवगणने आपल्या फॅन्सशी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर #AskAjay सेशन केले. यामध्ये फॅन्सने या दोघांनाही अनेक प्रश्न विचारले, यातील एका प्रश्नाचे मजेशीर उत्तर अजयने दिले.
एका फॅनने एक असा प्रश्न विचारला, ज्यावर अजयने त्याच्यावरच शब्दबाण कसला. फॅनने विचारले, ‘तुम्ही चित्रपटात नेहमी गाडी फिरवत का येता?’ त्यावर अजय देवगनने उत्तर दिलं, ‘आधी अक्षय कुमारला विचारा, की तो नेहमी हेलिकॉप्टरमध्ये लटकून का येतो?’ अजयच्या या प्रश्नावर चाहते देखील निरुत्तर झाले. अक्षय कुमार आणि चाहत्यांनी देखील अजयच्या या ह्युमरचे कौतूक केले.