
चार घटनांमध्ये दहा लाख रुपयांचा ऐवज लंपास
पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. उपनगरांसह मध्यवस्तीत देखील घरफोड्यांचे सत्र कायम आहे. चोरटयांनी कोरेगाव पार्क परिसरातील आतुर पार्क येथे हात साफ करीत ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच वडगाव शेरीत दोन ठिकाणी आणि हडपसरमध्ये देखील घरफोडीच्या घटना घडल्या. या सर्व बंद सदनिका फोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा नऊ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लांबवला.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अमित सतपाल कोचर (वय ५८, रा. बिल्डिंग नंबर ३, आतुर पार्क, नेलर रोड, कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरामध्ये झोपलेले होते. अज्ञात चोरट्याने १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री त्यांच्या सोसायटीत शिरला. मध्यरात्री कोचर कुटुंबीय झोपलेल होते. चोरट्याने पहिल्या मजल्यावरील खिडकीतून त्यांच्या घरात यांच्या घरात प्रवेश केला. कपाट उचकटून चोरट्याने दागिने आणि रोकड असा ३ लाख ५० हजार ऐवज चोरून नेला. याच सोसायटीतील रायचंद्र ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यालय आणि आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड आहेत.
वडगाव शेरीतील सोमनाथनगर आणि गणेशनगरमध्ये घरफोडीच्या दोन घटना घडल्या. सोमनाथनगरमधील एका फ्लॅटमधून ५ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी उज्ज्वला राजेंद्र साळवी (वय ५०, रा. ग्रेहवाल हाऊसिंग सोसायटी, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि अन्य मौल्यवान वास्तू लंपास केल्या. तर, दुसऱ्या घटनेत वडगाव शेरीतील गणेशनगर भागातील एका सदनिकेतून चोरट्याने मोबाइल आणि अंगठी असा २१ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पुनम रमेश पाटील (वय २९, रा. गणेशनगर, ऑक्सीजन पार्क जवळ, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे.
तर, हडपसर भागातील पापडे वस्ती परिसरात असलेल्या स्वप्नलोक सोसायटीमधून चोरट्यांनी ५० हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी रितेश भीमरावजी पिसे (वय ३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिसे यांच्या सदनिकेच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटला. घरात प्रवेश करून ५० हजार रुपयांचा ऐवज लांबवला.