
बसर अल-असाद यांनी केली विरोधकांना हलक्यात घेण्याची चूक, १४ वर्षीय मुलाच्या पेंटिंगमुळे सीरियात सत्तापालट
#दमास्कस : सीरियात सत्तापालट झाला असून राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद देश सोडून रशियात पळून गेले आहेत.सीरियातीळ बहुतांश शहरांचा ताबा बंडखोर गटांनी घेतला आहे. राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्यानंतर आता नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यानिमित्ताने देशांतर्गत विरोधाकडे गांभीर्याने न पाहण्याची चूक राष्ट्राध्यक्षांनी केली आणि ती आता त्यांना भलतीच महागात पडली आहे.
दीर्घकाळ चाललेल्या गृहयुद्धानंतर बसर अल-असादची सत्ता संपुष्टात आली. सीरियात लोकशाहीच्या स्थापनेसाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे रूपांतर गृहयुद्धात झाले आणि हजारो लोकांना यात आपले प्राण गमवावे लागले. सीरियात या चळवळीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा एक नाव समोर येते ते म्हणजे मौविया स्यास्नेह. १४ वर्षांच्या मौविया स्यास्नेह ही तीच व्यक्ती होती ज्याच्या पेंटिंगने सीरियामध्ये चळवळ सुरू झाली होती. १३ वर्षांपूर्वी, मौविया स्यास्नेह त्यावेळी १४ वर्षांचा होता. त्याने २०११ मध्ये सीरियातील दक्षिणेकडील सीरियन शहरात एक चित्र रेखाटले होते. त्यावर “अजाक एल डोर” म्हणजे ‘आता तुमची वेळ आहे, डॉक्टर’ असे लिहिले होते. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचा डॉक्टर असा उल्लेख करण्यात आला होता. हा तोच काळ होता जेव्हा अनेक अरब आणि आफ्रिकन देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू होत्या.
मौविया स्यास्नेहला पोलिसांनी २६ दिवस कोठडीत ठेवले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी बसर अल-असदच्या पोलिसांनी अनेक ठिकाणी गोळीबारही केला. मौविया स्यास्नेहच्या समर्थनार्थ चळवळीदरम्यान सीरियामध्ये फ्री सीरियन आर्मी उदयास आली. ज्यामध्ये असदच्या सैन्यातून पळून गेलेले अनेक लोक सहभागी झाले होते. या बंडाचा फायदा अतिरेकी गटांनीही घेतला, त्यामुळे अनेक भागात हिंसाचार आणखी पसरला. २०११ हे वर्ष सीरियासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. यावेळी हजारो सीरियन नागरिक लोकशाहीची मागणी करत रस्त्यावर उतरले. मात्र त्यांना प्रचंड सरकारी दडपशाहीला सामोरे जावे लागले. तथापि, सरकारच्या विरोधात विविध सशस्त्र बंडखोर गट तयार झाले आणि २०१२ च्या मध्यापर्यंत, बंडखोरी पूर्ण प्रमाणात गृहयुद्धात रुपांतरित झाली.
असद यांनी आंदोलन चिरडण्यासाठी केलेल्या चुकांमुळे परिस्थिती आणखी बिघडली. रशिया, इराण आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाहच्या मदतीने असदने बंडखोर गटांशी अनेक वर्षे यशस्वीपणे लढा दिला. पण अलीकडे अचानक सक्रिय झालेल्या बंडखोर गटांनी सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांसाठी खूप अडचणी निर्माण केल्या. कारण असद यांचे तीन मित्र रशिया, हिजबुल्ला आणि इराण आणि इस्रायल हे आपापल्या संघर्षात अडकले होते. हीच संधी हेरुन बंडखोरांनी असद यांची सत्ता उधळून लावली.
आता आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज
असद सरकारच्या पतनानंतर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून त्यांनी जुन्या ‘क्रांतीध्वजा’चा वापर केला, जो बशर अल-असद यांचे वडील हाफिज अल-असद यांच्या आधीच्या काळात वापरला जात होता. लोकांच्या या क्रांतीने देशातील आशा जागवल्या आहेत, मात्र या हालचालीतून स्थिर सरकार कधी आणि कसे स्थापन होईल, यावर अवलंबून आहे की, सीरियाचा भविष्यातील मार्ग कसा ठरेल. सध्याच्या परिस्थितीत, सीरिया अनेक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्यांचा सामना करत आहे. जागतिक शक्तींच्या हस्तक्षेपामुळे हा संघर्ष अधिक गुंतागुंतीचा होत असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर सहकार्याची गरज आहे.