
पुणे : युनिट ६ च्या पथकाने घरफोडी, मोबाईल चोरी गुन्ह्यातील सराईत रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली आहे. सदर कारवाई गुरुवार (५ डिसेंबर) रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दीत करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाम रजा ऊर्फ मसाट मजलुम सय्यद इराणी (वय २६, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असं अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गुरुवारी गुन्हे शाखा युनिट ६ हद्दीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांचे पथक लोणी काळभोर हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की घरफोडी, मोबाईल चोरी गुन्ह्यातील सराईत रेकॉर्डवरील आरोपी गुलाम इराणी लोणी काळभोर परिसरात आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून इराणी याला ताब्यात घेतले. कक्ष कार्यालयात आणून पथकाचे मदतीने त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याचा वाघोली पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हयांमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे. त्याचेकडुन पंचनाम्या अंतर्गत १ लाख रूपये किमतीचे दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. त्यानंतर त्याला पुढील तपासकामी जप्त मोबाईलसह वाघोली पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगीरी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार रमेश मेमाणे यांनी केली आहे.