
साखर कारखान्याच्या सुरक्षारक्षकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
पुणे : ऊस तोड मजुरांना निर्वस्त्र करून मारहाण बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या नांदर येथील शिवाजी शुगर ॲग्रो कारखान्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पाचोड पोलिसांनी याप्रकरणी कारखान्याचे सात कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पैठण तालुक्यातील नांदर येथे शिवाजी ॲग्रो कारखाना आहे. या कारखान्याच्या ऊस वाहतुकीसाठी लिमगाव (ता. पैठण) येथील ट्रॅक्टर मजूर रणजीत नामदेव ससाणे व बाळासाहेब घुगे यांचा ट्रॅक्टर कारखान्यामध्ये कामाकरिता लावण्यासंदर्भात करार झाला होता. परंतु, ट्रॅक्टर कारखान्यात लावण्यात आला नाही. त्यामुळे कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी मच्छिंद्र जाधव, आप्पासाहेब गंगाधर साळुंखे यांच्यासह अन्य ५ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ससाणे आणि घुगे या दोघांना बळजबरीने ताब्यात घेतले. कारखान्याच्या मालकीच्या गाडीमधून या दोघांना जबरदस्तीने २३ नोव्हेंबर रोजी कारखान्याच्या परिसरात आणण्यात आले.
त्यानंतर या दोघांच्या अंगावरील सर्व कपडे जबरदस्तीने उतरवण्यात आले. सुरक्षा रक्षक आणि जाधव, साळुंखे आदींनी अक्षरश: या दोघांना वर्तुळाकार उभे राहात घेरले. त्यांना जातिवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हातातील काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही मजुरांकडे असलेले ३३ हजार रुपये सुरक्षारक्षकाने काढून घेतले. पुढील तपास पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे करीत आहेत. दरम्यान, कारखान्याचे गुन्हा दाखल झालेले कर्मचारी पसार झाले आहेत. दलित समाजातील काही नेत्यांनी आणि पिडीत मजुरांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नसून पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.